पुणे - आजच्या धकाधकीच्या जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. या आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मॅरेथॉन किंवा लाँग डिस्टन्स रनिंग हा प्रकार शरीरासाठी फायदेशीर असून प्रत्येकानी रोज धावणे गरजेचे आहे, असे मत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांनी केले. ‘लोकमत’ने आयोजित केलेला महामॅरेथॉन हा चांगला प्रयोग असून नागरिकांनी यात जरूर सहभागी व्हावे आणि फिट राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉन १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आली आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.‘लोकमत’शी संवाद साधताना कानिटकर म्हणाल्या, व्यायामाचा कुठलाही प्रकार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे केवळ शरीरच चांगले राहत नाही तर मनही चांगले राहते. आज मोठ्या प्रमाणात जीवनशैली बदलली आहे. लोक बाहेरच्या खाण्याला पसंती देत आहेत. या बरोबरच बैठी कामेही वाढली आहेत. यामुळे ब्लड पे्रशर, डायबिटिज, मेंटल स्ट्रेस या सारखे आजार वाढत आहेत. या आजारांमुळे कीडनी फेल होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी शारीरिक हालचाली गरजेच्या आहेत. यासाठी मॅरेथॉन किंवा लाँग डिस्टन्स रनिंग ही महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासाठी रोज ३० ते ४० मिनिट देणे गरजेचे आहे. याचा मोठा फायदा मानवी शरीराला होतो.धावताना आपला श्वास फुलणार नाही, याची काळजी घेतल्यास या प्रकारचे धावणे हे शरीराला चांगलेच फायदेशीर ठरते. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जागृतीसाठी या सारख्या स्पर्धा आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. यामुळे ‘लोकमत’च्या या स्तूत्य उपक्रमाचा सर्वांनीच फायदा घ्यावा.
चांगल्या आरोग्यासाठी धावणे गरजेचे - मेजर जनरल माधुरी कानिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 2:04 AM