पुणे :लोहगाव (पुणे) विमानतळावर सुरू असलेले रन वे लायटिंगचे काम संपले आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून पुणे विमानतळावरून २४ तास विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळ २४ तास खुले झाल्याने विमानांची संख्या वाढणार आहे. परिणामी प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी पुणे विमानतळ प्रशासनाने २६ ऑक्टोबर २०२० पासून रात्रीची उड्डाणे बंद केली होते. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत विमानाची वाहतूक बंद करून धावपट्टीचे काम सुरू होते. यानंतर विमानतळ प्रशासनाने १६ ते २९ ऑक्टोबर २०२१ मध्ये एक महिना विमान वाहतूक बंद करून धावपट्टीची दुरुस्ती केली. त्यानंर लगेच रन वे लायटिंगचे काम सुरू झाले. ते काम आता पूर्ण झाले असल्याने १ डिसेंबरपासून पुणे विमानतळ पूर्वीप्रमाणे चोवीस तास कार्यरत राहणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिवाळी वेळापत्रक सुरू होणार :
१ डिसेंबरपासूनच पुणे विमानतळाचे ‘विंटर शेड्यूल’ सुरू होत आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून पुणे विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. दररोज जवळपास ६३ विमानांची उड्डाणे होत आहे. विंटर शेड्यूल सुरू झाल्यानंतर विमानांची संख्या दुप्पट होईल. १ डिसेंबरपासून कोइंबतूर, अमृतसर, व त्रिवेंद्रम शहरांसाठी नव्याने विमानसेवा सुरू होत आहे.
‘रन वे लाइट’चे विविध प्रकार :
पुणे विमानतळाच्या रन वे वर विविध प्रकारचे लाईट बसविले आहेत. यात टॅक्सी वे लाईट, पापी लाईट्स, रन वे एंड आयडेंटिफिकेशन लाइट, रनवे एज लाईट, थ्रेशोल्ड लाईट्स, अप्रोच लाईट आदी लाईट बसविले आहे. हे लाईट रन वेच्या विविध भागात बसविले आहेत.
धावपट्टीवरील रन वे लायटिंगचे काम पूर्ण झाले असून येत्या १ डिसेंबरपासून पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी २४ तास खुले होत आहे. याच वेळी पुणे विमानतळाचा विंटर शेड्यूलदेखील लागू करीत आहोत. त्यामुळे विमानांच्या संख्येत वाढ होईल.
- संतोष डोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ