धायरी : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन करून चाकणकर यांना पुढील ७२ तासात जिवे मारू, अशी धमकी दिली आहे. या धमकी नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंगळवार ३१ मे रोजी रुपाली चाकणकर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच असा धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर सोमवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी एका व्यक्तीने फोन केला होता. यामध्ये त्या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना पुढील ७२ तासात जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली.
त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी ज्या नंबर वरून फोन आला होता. त्या व्यक्तीशी संपर्क केला असता तो व्यक्ती हा अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. याबाबत पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. तर याअगोदरही दोन वेळा त्यांना धमकीचे फोन गेले होते. तर रुपाली चाकणकर तुमचा कार्यक्रम करु, अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरण्यात आली होती. महिला आयोगाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांना राज्य महिला आयोगाचा दणका दाखवला होता. त्यानंतर असे धमकीचे फोन आल्याने चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे.