पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांविरोधात पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रूपाली पाटील या ट्रोल करणार्यांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. कायदेशीर कारवाई करूनही जर ट्रोलर ऐकत नसतील तर त्यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच ट्रोल केल्याने मला फरक पडत नाही. मी ग्रेट लीडर आहे. दमदार आणि स्वतःच संरक्षण करणारी लीडर आहे. येणाऱ्या काळात मी आमदार होणार, मुख्यमंत्री अन् प्रधानमंत्रीही होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..
रुपाली पाटील म्हणाल्या, मनसेतील नेत्यांच्या आशीर्वादानेच मला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मी माझ्या कामामुळे फेसबुकवर प्रसिद्ध आहे. त्याचाच त्रास मनसेच्या कार्यकर्त्यांना होतो. त्यामुळे मला अशाप्रकारे पातळी सोडून ट्रोल केलं जातं. मनसेत महिला कुठे आहेत. काम करून फेसबुकवर टाकणारी महिला मीच होते. मी पक्ष सोडला ते त्यांना पचनी पडत नाही, त्याचा त्यांना त्रास होतो आणि त्यामुळेच मला फेसबुक अध्यक्षा म्हटलं जातं, परंतु अशाप्रकारे हिनवल्यामुळे मला काहीही फरक पडत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले..
रुपाली पाटील-ठोंबरे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 कार्यकर्त्यांविरोधात पुण्यातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. त्यानंतर रूपाली पाटील या आक्रमक झाल्या आहेत.