'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:08 PM2024-08-01T13:08:53+5:302024-08-01T13:09:58+5:30
अमोल मिटकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको
पुणे : अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत', अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला होता. त्या टीकेनंतर आज मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दरम्यान, या घटनेनंतर आता मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय. त्याचे पडसाद पुण्यातही उमटताना दिसू लागले आहेत.
पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी पुण्यात आल्यावर मारू असा इशारा दिला होता. त्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देत तुमच्या बापाचं राज्य नाही असं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. हा गुन्हेगारीचा आखाडा नाही असं त्यांनी सांगितले आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, राजकारणात विकासाबद्दल बोलायला पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको. तुमची मर्दानगी तुमच्या घरी दाखवा. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरावी. आंदोलन जनतेच्या विकासासाठी करा, जनतेच्या कामासाठी शंभर वेळा जेलमध्ये जावा.
पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. राज साहेब ठाकरे पुण्यात आले. राज ठाकरेंनी आमच्या नेत्यांवर टीका केली. राज ठाकरेंनी अजित परावर टीका केल्यानंतर, राष्ट्रवादीकडून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं. राजकारणाचा दर्जा इतका खाली आलाय की, प्रत्युत्तर दिलं म्हणून डायरेक्ट हाणामारीची भाषा केली गेली. मनसेच्या लोकांनी आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली गाडी फोडल्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मनसेच्या एका कार्यकर्त्याचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. विचारांची लढाई झाली पाहिजे, टीका करताय तर प्रत्युत्तर सहन करायची तुमची तयारी पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.