पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि शिंदे-फडणवीस सरकारचा गैरकारभार याविरोधात आम्ही मुंबईत विराट मोर्चा काढला आहे. तसेच राज्यपालांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी प्रतिक्रिया मोर्चात सामील झालेल्या मविच्या नेत्यांनी शनिवारी दिली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून या मोर्चावर सडकून टीका करण्यात आली होती. मविआचा मुंबईतील मोर्चा हा 'मिनी मोर्चा' होता, अनेकांना पैसे देऊन या मोर्चात आणल्याचा आरोपही भाजपने केला आहे. हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलेला व्हिडीओ शनिवारच्या मोर्चातील नसून तो काही वर्षांपूर्वी झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील असल्याचे समोर येत आहे. असाच एक व्हिडीओ संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नंतर भाजपने त्या व्हिडीओवरून राऊत यांच्यावर टीका केली होती. आता तोच व्हिडिओ रुपाली ठोंबरे पाटलांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत 'एक मराठा, लाख मराठा' तसेच छत्रपती 'शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा स्पष्ट ऐकू येत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना पाटील म्हणाल्या, "महाविकास आघाडीचा विराट मोर्चा ड्रोन मधून पहायचा होता पहा उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुष के सन्मान मै महाविकास आघाडी मैदान मैं." हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी रुपाली ठोंबरे पाटलांना चांगलंच खडसावलं आहे.
शनिवारी मुंबईत महाविकास आघाडीकडून महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला दुसरीकडे उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन करण्यात आले होते. महामोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली होती