पुणे - गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहेत. अहमदनगर येथे शनिवारी शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, अमित शहा दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. शहा यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राखीव सूट गृहमंत्र्यांना दिल्याचे ट्विट केले होते. या ट्विटवरुन त्यांना नेटीझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे.
पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या धडाडी कार्याचं कौतूक केलं. तर, रुपाली ठोंबरे यांनीही अजित पवारांच्या कार्यशैलीमुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नेटीझन्सने त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. जरा दमानं, धीर धरा... असे म्हणत काहींनी त्यांना नेते अजित पवार यांच्याबद्दलचं कौतुक अतिशयोक्ती असल्याचा टोला लगावलाय.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, पण सर्कीट हाऊस हे सरकारी असते. त्यात, देशाचे गृहमंत्री येत आहेत, म्हटल्यावर ते त्यांना सहज उपलब्ध होण्यास काहीही अडचण नसते, असे ट्विटरवरुन काहींनी सांगितले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट अमित शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत. हेच आहेत शरद पवार यांचे संस्कार... असे ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले होते. त्यावरुन, नेटीझन्सने त्यांना चांगलंच ट्रोल केलंय. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत, ते ग्रामपंचायत सदस्य नाहीत, अशा शब्दात अनेकांनी त्यांना सुनावलंय. तर, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंतांच्या ताब्यात प्रशासकीय जबाबदारी म्हणून ते सर्कीट हाऊस असते, असेही काहींनी सुनावलं आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती
गृहमंत्री अमित शाह रविवारी यांनी रविवारी सकाळी पुण्यातील मानाचा गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून ते पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे.