पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करून नाना पटोले यांना प्रश्न विचारला होता. त्या विडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. त्याचसोबत ट्विटरवर नाना पटोले यांनी टॅग करत "नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेल मध्ये" असा खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. तर, याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही स्पष्ट भूमिका व्यक्त केली. आता, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही थेट प्रतिप्रश्न केला आहे.
तुम्ही ब्लु फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याच उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. मुळात तुम्हाला नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील व्हिडिओ ट्विट टाकण्याचं प्रयोजन काय? तो तथाकथित व्हिडिओ खरा आहे की खोटा त्याची पडताळणी केली का? त्या महिलेने तुम्हाला कोणतीही तक्रार केली का?, असे अनेक प्रश्न रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, भाजप नेते श्रीकांत देशमुख यांच्या व्हिडिओवेळी कुठं होतात. आता, संजय राठोड हेही तुमच्याकडे आले आहेत, असेही ठोंबरे यांनी म्हटले. तर, नाना पटोले यांनी आयपीसीनुसार चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी सूचवले आहे.
तुम्हाला दुसरं काम राहिलं नाही
संबंधित व्हिडिओप्रकरणातील महिलेला कोणताही त्रास झाला असता आणि त्या महिलेने तुम्हाला तक्रार केली असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र, तुम्हाला विरोधी पक्षनेत्याच्या खासगी आयुष्यात सातत्याने ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेले नाही, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला.
रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केली भूमिका
सध्या सर्वत्र गाजत असलेला नाना पटोले यांच्या व्हिडिओच्या विषयी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, आमच्याकडे कुठल्याही महिलेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नाही. जर ती केली असती तर नक्की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असती, असेही चाकणकर यांनी म्हटले.
नाना पटोले यांनीही मांडली आपली बाजू
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी बोलताना नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली. मला बदनाम करण्याचं कारस्थान असून याबाबत व्हिडिओची तपासणी करुन आमच्याकडून कायदेशीर बाजू मांडण्यात येईल. ''मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, पण राजकारणाची पातळी जी खाली उतरलीय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आमची लीगल टीम कार्यवाही करणार आहे,'' असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. तसेच, चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना मला त्या ताईंबद्दल काहीही बोलायचं नाही, संजय राठोडांबाबत त्यांनी काय केलं. आमच्या प्रकरणात काय घडलंय ते आमची लीगल टीम पाहातेय, उद्या ते सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.