लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुठेही गेलो तरी न्याय मिळत नसल्याने आम्ही आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया वकिलांच्या सल्ल्याने पूर्ण करत आहोत. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे रूपी बँक ठेवीदार, खातेदार कल्याणकारी संघाच्या वतीने सांगण्यात आले.
पत्रकारांशी बोलताना संघाचे पदाधिकारी धनंजय खानझोडे म्हणाले, अडचणीत आलेल्या बँकांमध्ये ठेवीदारांना ५ लाख रुपये देण्याची तडजोड आम्हाला मान्य नाही. ७ वर्षांच्या कमीत कमी व्याजाने आमच्या ठेवीवर जेवढी रक्कम होईल तेवढी द्या, अशी आमची मागणी आहे. ५ लाख रुपये वाटप करण्यात आले, तर बँकेजवळ काहीच पैसे राहणार नाहीत. त्यामुळे आपोआपच ठेवीदारांचे शिल्लक राहिलेले पैसे बुडित समजले जातील. काही विशिष्ट लोकांचा आमच्यावर सातत्याने दबाव आहे. त्यातूनच बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे; पण अशा दबावाला ठेवीदार भीक घालणार नाहीत, असे खानझोडे म्हणाले. दत्तात्रय लिपारे त्यांच्यासमवेत होते. खानझोडे पुढे म्हणाले, ठेवीदारांना त्यांचे पैसे व्याजासह मिळायला हवेत, अशी आमची मागणी आहे. बँकेचे लहान बँकेत रूपांतर करायचे, नाबार्ड बँकेत विलीनीकरण करायचे, या उपायांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाही तर ठेवीदारांचेच नुकसान आहे. ५ लाख रुपये देणार या घोषणेतही भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे सोडण्याचाच डाव आहे. सरकारने ताबा घेऊनही बँकेत काहीही फरक पडलेला नाही. आम्ही न्यायालयात दावा दाखल केला आहे, तर त्याचा निकालही लागायला तयार नाही. हे सगळे संताप आणणारे आहे; पण कायदेशीर मार्गाने आम्ही आमची लढाई लढतो आहोत, तर आता काही प्रवृत्ती ही लढाईही मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप खानझोडे यांनी केला.