अंकुश जगताप, पिंपरीराष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत कामधेनू ग्रामदत्तक योजनेतून ताथवडे येथील वळूमाता प्रक्षेत्रातर्फे गावोगावी दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हिरवा चाराविकासाचा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याचबरोबर आता प्रक्षेत्राच्या जागेत चाऱ्यासाठी ज्वारीच्या वाळलेल्या कडब्याचे उत्पादन करण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार पेरणीही झाली आहे. २ कोटींच्या निधीतून विविध विकासकामांना सुरूवात झाल्याची माहिती विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांकडील जनावरांना पोषक हिरवा चारा मिळावा, जणावरांपासून भरघोस दुग्धउत्पादन मिळावे, यासाठी चारा विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार कमी पाण्यातही तग धरून राहणाऱ्या नेपीयर या वाणाच्या चारापीकाची निवड करण्यात आली आहे. या चाऱ्याच्या ठोंबांचा शेतकऱ्यांना मोफत पुरवठा केला जात आहे. प्रतिगुंठ्यासाठी २५० ठोंबांच्या लागवडीची गरज असते. या प्रमाणानुसार शेतकरी मागणी करतील तितक्या ठोंबांचा मोफत पुरवठा वळूमाता प्रक्षेत्राकडूून केला जाणार आहे. एक गुंठ्यामध्ये लावलेल्या ठोंबांपासून वर्षभरात २ मेट्रीक टन हिरवा चारा उपलब्ध होतो. सुक्या चाऱ्यासोबत दिला गेल्यास इतका चारा ५ जणावरांना पुरेसा होतो. शेतीमध्ये पाण्याची सोय न झाल्यास अनेकदा पारंपरिक चारापीके होरपळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना जणावरांसाठी ओला चारा उपलब्ध करणे शक्य होत नाही. परिणामी विशेषत: उन्हाळ्यात दुग्धोत्पादनात मोठी घट होत व्यवसाय तोट्याचा होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे बारमाही हिरवे राहणाऱ्या नेपीयरच्या लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. ३० लाख ठोंबांचे वाटप झाले असून, आणखी २५ लाख ठोंबे उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गावोगावी होणार चाराविकास
By admin | Published: December 08, 2014 1:11 AM