उरुळी कांचन: उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, वाडे बोल्हाई या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर शहरी भागातील नागरिकांनी ताबा मिळवल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑनलाईन नोंदणी करतांना अँपवर शहरी भागातील नागरिकांचेच नंबर लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
पूर्व हवेलीमधील चार लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरिकांना लस मिळणार नसेल. तर, वरील चारही लसीकरण केंद्रे ताबडतोब बंद करण्यात यावीत. अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्याकडे केली आहे. तसेच पुढील दोन दिवसात वरील चारही लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरिकांना लस उपलब्ध करुन न दिल्यास, आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
याबाबत लोकमतशी बोलताना उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन म्हणाले, लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरीकांना लस मिळत नसल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत. एकीकडे लॉकडाऊन सुरु असताना, पुणे शहर, पिंपरी चिंचवड हद्दीतील नागरिक आमच्याकडे गर्दी करत आहेत. शहरी भागातील उच्च शिक्षित नागरिक अँपवर त्वरित माहिती भरत असल्याने, ग्रामींण भागातील नागरिकांना नाव नोंदवण्याची संधीच मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. यामुळे ग्रामींण भागातील भागातील नागरिकांना लस मिळावी यासाठी अँपमध्ये सुधारणा करावी अथवा ग्रामींण भागातील लसीकरण केंद्रे बंद करावीत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.