लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ग्रामीण भागात ज्ञानाचे भांडार आहे. प्रत्यक्ष जीवनातून विज्ञान जगणारी माणसे पूर्वी होती. शेतकरी विविध प्रकारची पिके एकावेळी लावून कीड नियंत्रण करू शकत होता. त्याला रासायनिक कीटकनाशकांची गरज भासत नव्हती. मराठीत परंपरेने आलेले मोठे ज्ञान आहे. पण इंग्रजी माध्यमाच्या हट्टापायी आपण ते ज्ञान गमावून बसतो आहोत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान रंजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. राजेंद्रकुमार सराफ अध्यक्षस्थानी होते. विनय र. र., मोहन सावळे, संजय मा. क., शशी भाटे, नंदकुमार कासार, सुजाता बरगाले आदी यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेत चिखली येथील ज्योती हेमंतकुमार कोरटकर यांना प्रथम, पुण्यातील शालेय विद्यार्थिनी रीमा लिओ रॉड्रिग्ज हिचा द्वितीय, तर तृतीय क्रमांक चिखली येथील साधना दत्तात्रय खुळे यांना मिळाला. अंतिम फेरीत अठरा विजेत्यांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना इरा लिमये स्मृती निधीतून रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
“महाराष्ट्रातून ८५८ जणांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रौढांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील स्पर्धक सर्वाधिक होते. प्राथमिक फेरीतील ५४ विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यांना विविध प्रकारचे दहा प्रयोगांची वैज्ञानिक पडताळणी दोन तासात करण्याचे आव्हान देण्यात आले. त्याशिवाय त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या,” असे राजेंद्रकुमार सराफ म्हणाले. विज्ञान रंजन स्पर्धेचे आयोजक विनय र. र. यांनी प्रास्ताविक केले. सुनील पोटे यांनी सूत्रसंचालन केले.
सविस्तर निकाल
प्रथम - ज्योती हेमंतकुमार कोरटकर, चिखली
द्वितीय - रीमा लिओ रॉड्रीग्ज, पुणे
तृतीय क्रमांक - साधना दत्तात्रय खुळे, चिखली
उत्तेजनार्थ
सुमन बापूसाहेब मुखेकर, रुपाली नितीन नीळकंठ, वैभव अंगद कांबळे, प्रसाद बाळू नेवाळे (सर्व चिखली), सानिका रविंद्र शिंदे (चिंचवड), जैनील धर्मेश जैन, तनिष हेमंत चंगेडिया, ओंकार सूचित मुंदडा, हितांशी मनीषकुमार शहा (सर्व पुणे).