चाकण : सोशल मीडियाचा वापर वाढल्याने अश्लील मेसेज किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तरुणांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढले आहेत. युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भुरळ घालायची, त्यांच्याशी जवळीक वाढवायची आणि अश्लील व्हिडीओ कॉल करून तरुणांना ब्लॅकमेल करायचे आणि पैसा उकळायचा. अशा घटना तालुक्यात वाढल्या असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियातून कोणतीही माहिती सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक युवकांनी त्याचा वापर वाढवला आहे. परंतु अलीकडील काळात इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना अश्लील जाहिरात दाखवत अश्लील मेसेज व अश्लील व्हिडीओ कॉल करुन युवकांना त्यामध्ये ओढले जात असल्याच्या घटना घडत आहेत. काही युवकांना त्यांच्या व्हाॅटसॲपवर युवकांचे चेहरे दिसणारे अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल केले जात आहे. त्यानंतर युवकांना तुमचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू आम्हाला पैसे द्या नाहीतर तुमच्या नातेवाइकांना पाठवून देऊ अशा धमक्या देण्यात येतात.
यास अनेक युवक - युवती बळी ठरत आहेत. परंतु याबाबत कुणाशी बोलू शकत नसल्याने अनेक युवक समोरील व्यक्तींना ऑनलाईन पैसेदेखील पाठवत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करण्याची वेळ युवकांवर आलेली आहे. यामुळे तरुणांवर मानसिक तणावात जगण्याची वेळ येत आहे. परंतु युवकांनी अशा बनावट कॉलपासून सतर्क राहण्याची गरज आहे.
* फेसबुकवर बनावट प्राेफाईल बनवून मुलगी असल्याचे भासवून मुलांना आकर्षित केले जाते. त्यांच्या मोबाईल नंबर मिळवला जातो. मुलांशी अश्लील संवाद साधून त्याचे रेकॉर्डिग बनवून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. यामुळे फेसबुकचा वापरदेखील धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.
* नागरिकांनी बनावट फोन कॉल, मेसेज, फेसबुक, इन्स्टाग्राम यापासून सावध राहण्याची गरज आहे. अनेकदा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सोशल मीडियाद्वारे जबाबदारीने वापर करण्याबाबत सूचना केल्या जातात. याबाबत नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
* अशा सापळ्यात अडकले असल्यास नागरिकांनी सायबर क्राईम तसेच पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तक्रार केल्यास तक्रारदारांचे नाव गुपित ठेवले जाते व गुन्हेगारांचा शोध घेतला जातो.