सराफा बाजार, कपड्यांची बाजारपेठ दोन महिन्यांनी खुली झाल्याने ‘विंडो शॉपिंग’चा आनंद ‘चोखंदळ’ पुणेकरांनी लुटला. यात प्रत्यक्ष खरेदी कमी झाली असली, तरी हव्या त्या वस्तू हाताळण्यातले सुख पुणेकरांनी घेतले. ‘वर्क फ्रॉम होम’ वाढल्याने लॅपटॉप खरेदी, दुरुस्ती, संबंधित सुट्या भागांची खरेदी यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक्स’च्या दुकानांमधली आवक-जावक वाढली.
गेल्या पंधरवड्यापासून जोरदार पावसाने पुण्याला वरचेवर झोडपले आहे. या पार्श्वभूमीवर आच्छादनासाठीची ताडपत्री, प्लास्टिक या खरेदीसाठी मंगळवार पेठ भागात गर्दी दिसली. पावसाळ्याच्या तोंडावर हार्डवेअर, प्लंबिगशी निगडित वस्तूंच्या दुकानांमध्ये पुणेकर साहित्य खरेदी करताना दिसले. मात्र, कारागीर पुरेसे मिळत नसल्याने त्यांची अडचण झाल्याचे आढळले. गंमत म्हणजे एक जूनला अनेकांचे वाढदिवस असल्याने रविवार पेठेतल्या बोहरी आळीत वाढदिवस साजरे करण्याच्या साहित्य विक्रीत वाढ झाल्याचेही दिसले.
चौकट
खरेदीच्या उत्साहाला, पावसाची साथ
दुपारी दोनपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी होती. तोपर्यंत कडकडीत उन असल्याने खरेदी, विंडो शॉपिंगच्या आनंदावर पाणी पडले नाही. पण अडीच नंतर वातावरण बदलले आणि बदाबदा पाऊस सुुरू झाला. त्यामुळे बाजारपेठेतून घरी परतणारे ग्राहक, दुकानदार, दुकानातला कर्मचारी वर्ग यांची तारांबळ उडाली.