नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तुंबळ युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, भारत सरकारने ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्याचं काम हाती घेतलं असून ते वेगात सुरू आहे. यावेळी, तेथील दोन भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुत्र्यालाही मायदेशी भारतात आणण्याची विनंती केली. विशेष म्हणजे सरकारने या विद्यार्थ्यांना त्यांचे जीवलग असलेल्या श्वानास घेऊन जाण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या या प्राणीप्रेमाचं अन् मानवतेचं कौतूक केलं.
भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी परतण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये पाठवले असून तेथून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात येत आहे. या दरम्यान, एका विद्यार्थ्याने आपल्या पाळीव श्वानासही मायदेशी नेण्याची विनंती केली होती. त्यास, मंत्रीमहोदयांनीही परवानगी दिल्याने आपल्या लाडक्या प्राण्यांसह विद्यार्थी मायदेशी परतत आहेत.
पुण्यातील युक्ता नामक विद्यार्थीनीने आपल्या लाडक्या नीला या श्वानासह भारतात येण्याची विनंती केली. पोलँडमार्गे वायू सेनेच्या मदतीने युक्ता आणि निला दोघेही सुरक्षित भारतात परत आले. यासाठी, मंत्री जनरल व्हि.के. सिंग यांनी मोलाची मदत केल्याचं युक्ताने म्हटले आहे. तर, व्हि.के.सिंग यांनीही ट्विट करुन लवकरच युक्ता आणि नीलाला भारतात भेटू असे म्हटलंय. तसेच, या सेवेचा मला आनंद होत आहे, जय हिंद... असेही त्यांनी म्हटले.
जनरल व्ही.के. सिंग यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एक विद्यार्थी आपल्या कुत्र्याला घेऊन वायूसेनेच्या विमानात चढताना दिसत आहे. त्यावेळी, मंत्री व्ही. के. सिंग त्या श्वानास लाडाने कुरवळत असल्याचं दिसून येतं. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणणं हे आव्हान असताना, सोबतच्या पाळीव प्राण्यांनाही विमातून भारतात आणण्यात येत आहे. त्यामुळे, या विद्यार्थी आणि मोहिमेचं कौतूक होत आहे.
केरळमधील मुलीनेही पाळीव कुत्र्यास भारतात आणले
आर्या ऑल्द्रन ही केरळमधील राहणारी विद्यार्थीनी आहे. तिचा जो फोटो शेअर होत आहे. त्यामध्ये तिच्यासोबत तिच्या हातामध्ये एक पाळीव कुत्रा दिसत आहे. तसेच या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर युद्धक्षेत्रातून पाळीव कुत्र्यासह सुखरूपणे परत आल्याचा आनंदही स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर आर्याने तिच्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. आर्या ही युक्रेनमधील विन्नित्सामध्ये असलेल्या नॅशनल पिरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. केरळचे शिक्षणमंत्री व्ही. सिवनकुट्टी यांनी सांगितले की, आर्या इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी आहे. जग अशाच प्रेमाने चालते, असे ते म्हणाले.