- प्रशांत बिडवे
पुणे : रशिया- युक्रेन युद्धामुळे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले. त्यानंतर, देशात काेठेही प्रवेश न मिळाल्याने, तसेच महागड्या वैद्यकीय शिक्षणामुळे असंख्य विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंग, फार्मसी, विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे असंख्य भारतीय विद्यार्थ्यांचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न भंगले आहे.
रशियाने गतवर्षी २४ फेब्रुवारी राेजी युक्रेनवर हल्ला केला आणि युद्ध पेटले. भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जीव वाचविण्यासाठी देशात परतावे लागले. देशात परतलेल्या १५ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे बाराशे विद्यार्थी हे महाराष्ट्रातील हाेते. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा पेच निर्माण झाला असून, विद्यार्थी आणि पालकांनी आंदाेलने केले.
राजकीय नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडले. शेवटचा उपाय म्हणून न्यायालयातही धाव घेतली. मात्र, मागील एक वर्षांत वैद्यकीय प्रवेशाबाबत काहीच ताेडगा निघाला नाही. अखेर निराश न हाेता, अनेक जण पुन्हा परदेशात संधी शाेधत आहेत. काहींनी रशिया, जाॅर्जिया आणि कजाकिस्तान आदी देशात एमबीबीएससाठी प्रवेशही घेतला आहे.
आठवणींनी आजही अंगावर काटा येताे
महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनमधील विविध शहरात वैद्यकीय शिक्षण घेत हाेते. रशियाने हल्ले सुरू करताच, आमचे कुटुंबीय चिंतित झाले. दरम्यान, एक ते दीड आठवडे बंकरमध्ये राहून प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. युद्धामुळे गंभीर वातावरण निर्माण झाले हाेते. आकाशात हेलिकाॅप्टर, लढाऊ विमाने घिरट्या घालत हाेते. बाॅम्ब, मिसाईल हल्ले हाेत हाेते. खारकीव्हसह इतर शहरातून असुरक्षित वातावरणात युक्रेन सीमेलगतचे हंगेरी, स्लाेव्हाकिया, राेमानिया, पाेलंड देश गाठताना केलेला प्रवास आणि ताे अनुभव आठवताच, आजही माझ्या अंगावर काटा येताे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मी युक्रेनमधील झॅप्राेजिया शहरात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत हाेताे. युद्ध सुरू झाल्यानंतर हंगेरीमार्गे दिल्लीला परतलाे. युक्रेनहून माझ्यासाेबत परतलेल्या अनेकांनी अभियांत्रिकी, फार्मसी, विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे.
- अनिकेत कासार, विद्यार्थी.
खारकीव्हमध्ये मुलीने एमबीबीएसचे प्रथम वर्ष पूर्ण केले. आम्ही पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, अद्याप कुणालाही वैद्यकीय काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. भारतात खासगी वैद्यकीय काॅलेजची फिस जास्त आहे. त्यामुळे सध्या काेठेही प्रवेश घेतलेला नाही.
- सतीश नलावडे, पालक.
युक्रेनमधील युद्धाच्या अतिशय नाजूक परिस्थितीतून मी भारतात परतलाे. त्यामुळे पुन्हा देशाबाहेर पडावे, अशी कुटुंबीयांची मानसिकता नाही. सध्या मी सिव्हिल इंजिनीअरिंग पदवीला प्रवेश घेतला आहे.
- सिद्धेश बच्छाव, विद्यार्थी.