Russia-Ukraine War : रशिया -युक्रेन युद्धाचा द्राक्ष निर्यातीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:01 PM2022-05-14T13:01:50+5:302022-05-14T13:05:10+5:30
चीननेही कोरोनाचे कारण देत यावर्षी काळी द्राक्ष नाकारली...
पुणे : रशिया-युक्रेन युद्धाचा फटका भारताच्या द्राक्ष निर्यातीलाही बसला. दोन्ही देशांमध्ये यावर्षी युद्धाआधीचा काही काळ वगळता नंतर एकही कंटेनर गेला नाही. चीननेही कोरोनाचे कारण देत यावर्षी काळी द्राक्ष नाकारली. त्यांच्याकडेही एकसुद्धा कंटेनर गेला नाही.
देशातून दरवर्षी द्राक्षाच्या हंगामात २ लाख टनापेक्षा जास्त द्राक्षाची निर्यात होते. साधारण २२०० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. यात सर्वाधिक म्हणजे एकूण व्यवसायाच्या ९० टक्के वाटा राज्याचा व त्यातही पुन्हा ९० टक्के एकट्या नाशिक जिल्ह्याचा असतो. देशातील सर्वाधिक द्राक्ष नाशिकमध्येच होतात. दरवर्षी द्राक्ष निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असते.
युरोपियन देशांच्या समुदायात भारतातील द्राक्ष मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. तसेच आखाती प्रदेशातही द्राक्ष जातात. यंदाचा द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाला त्यावेळी नेहमीप्रमाणे रशिया व युक्रेनमधूनही द्राक्षाला मागणी होती. सुरुवातीच्या काळात काही कंटेनर गेले व नंतर एकदम युद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे त्या देशांची निर्यात थांबली. नेमके त्याचवेळी चीनने कोरोनाचे कारण देत काळी द्राक्ष नाकारली.
रशिया-युक्रेन युद्ध व चीनमधील कोरोना या दोन्ही गोष्टींमुळे द्राक्ष निर्यातीचे नुकसान झाले हे खरे आहे. मात्र ग्रेट ब्रिटन, स्वीर्त्झलंड, नेदरलँड अशा अन्य देशांमध्ये निर्यात व्यवस्थित झाली. देशातून २ लाख टन द्राक्षाची निर्यात यंदा झाली. २०० टन निर्यात कमी झाली. एकूण आर्थिक उलाढाल २ हजार कोटी रुपयांची झाली. २०० कोटी रुपयांची घट झाली. स्थानिक बाजारपेठेपेक्षा परदेशात भारतीय द्राक्षाला चांगला दर मिळतो. त्यातही नाशिकच्या द्राक्षांनी जगाची बाजारपेठ काबीज केली आहे.
- गोविंद हांडे, सल्लागार, राज्य निर्यात कक्ष