पुणे : चाकण येथे घडलेल्या तोडफोडीनंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे नाशिक व पुणे औरंगाबाद सेवा सुरु करण्यात आली. यामुळे तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांनी शिवाजीनगर बस स्थानकावर गर्दी केली होती.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून करण्यात आलेल्या आंदोलनाला चाकण येथे हिंसक वळण मिळून बसची जाळपोळ झाली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी वातावरण निवळल्यावर संध्याकाळी पाच वाजता पहिली बस नाशिककरिता सोडण्यात आली. गुरुवारी मात्र स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आगारातून एसटीच्या सर्व फेर्या झाल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु नाशिक, औरंगाबाद, नगर, जुन्नर येथे जाणार्या गाड्यांचे वेळापत्रक दिवसभर कोलमडले होते, तर अनेक गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याचे चित्र दिसले. दि. २० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आगारात मिळून एसटीच्या सुमारे सहाशे फेर्या रद्द करण्यात आल्या असून पुणे विभागात एसटी जाळपोळीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले असून फेर्या रद्द केल्याने सुमारे ८० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.