भिगवण : रोटरी क्लबच्या प्रांत ३१३१च्या माध्यमातून पुणे आणि रायगड या विभागांमध्ये ३,७०० शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा पुरविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जवळपास १० लाख विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. यामुळे शाळा हायटेक झाल्या अशी विद्यार्थ्यांची आधुनिक शिक्षणाशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या विकासात भर पडण्यास मदत होत आहे, असे मत जिल्ह्याचे नियोजित प्रांतपाल रवी धोत्रे यांनी भिगवण येथे व्यक्त केले.भिगवण येथील रोटरी क्लब भिगवणच्या पदग्रहण समारंभात धोत्रे बोलत होते. या वेळी भिगवण रोटरीचे मावळते अध्यक्ष रियाज शेख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष नामदेव कुदळे यांच्याकडे दिली. तर, उपाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच महिला रोटरी सदस्या वर्षा बोगावत यांची निवड करण्यात आली. या वेळी सचिन बोगावत म्हणाले, ‘‘भिगवण रोटरीच्या माध्यमातून १ कोटी ५० लाख रुपयांची विकासकामे करण्यात आली आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग, शुद्ध पाणी तसेच स्लिपिंग किट अशी, तर सामान्य नागरिक स्वच्छतागृह, ड्रेनेज व्यवस्था, शोषखड्डे, पाणी अडवा-पाणी जिरवा कामांचा सहभाग असल्याचे सांगितले.या वेळी भिगवणच्या सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, आबासो देवकाते, रामदास झोळ, अश्विनी शेंडगे, कमलेश गांधी, संजय खाडे, पप्पू भोंग, संपत बंडगर, दीपक वाघ, संकेत वायसे, केशव भापकर उपस्थित होते. तर, प्रमुख उपस्थितांमध्ये पुणे रोटरीचे अनिल गोयल, धनेंद्र गांधी, विशाल औटी, पंकज शहा, विकास टोपले, इंदापूर अध्यक्ष नंदकुमार गुजर उपस्थित होते. दीपक वाघ यांनी सूत्रसंचालन केले. रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले.
शाळा झाल्या ‘हायटेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:42 AM