पुणे : डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरेला त्याच्या बहिनीने वकिलांकडून राखी पाठवली हाेती. अंदुरेच्या मेव्हणीने न्यायालयाच्या परवानगीने काेर्ट हाॅलमध्ये राखी बांधली. त्याचबराेबर कुटुंबियांनी पाठवलेला ड्रेस देखील सीबीअायच्या तपासणीनंतर त्याला देण्यात अाला.
डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला सीबीअायने अाैरंगाबादहून अटक केली हाेती. अंदुरेने त्याच्या साथीदारांच्या मदतीने डाॅ. दाभाेलकरांवर गाेळी चालविल्याचा दावा सीबीअायने केला अाहे. अंदुरेला 19 अाॅगस्ट राेजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची सीबीअाय काेठडी सुनावली हाेती. अाज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला पुन्हा 30 अाॅगस्टपर्यंत सीबीअाय काेठडी देण्यात अाली अाहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंदुरे याला बेलापुरवरून न्यायालयात हजर करण्यात आले. अंदुरेच्या बहिनीने वकीलांच्या मार्फत अंदुरेला राखी पाठवली हाेती. सुनावणीच्यावेळी त्याच्या काही जवळच्या व्यक्ती न्यायालयात हजर हाेत्या. अंदुरेच्या मेव्हणीने त्याला न्यायालयाची परवानगी घेवून कोर्ट हॉलमध्ये राखी बांधली. त्यावेळी अंदुरे यांने तिच्याकडे कुटुंबियांची चौकशी केली.
दरम्यान 'सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली', असल्याची शक्यता सीबीअायने काेर्टात वर्तवली अाहे. नालासोपारा येथे स्फोटके जप्त केल्यानंतर वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला अटक केली होती.