पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया’ ही मोहीम सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २१ मे)रोजी होणार आहे. यावेळी प्रसिध्द क्रीडा समीक्षक सुनंदन लेले तेंडुलकर यांची मुलाखत घेणार आहेत. विद्यापीठ आवारातील आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात ही मुलाखत रंगणार आहे. भारतातील तरुण पिढी विविध कारणांमुळे मैदानाकडे फारशी वळत नाही. अलिकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील एक तृतीयांश तरुण मुले-मुली कोणताही खेळ खेळत नाहीत किंवा व्यायामही करत नाही. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून‘मिशन यंग अॅन्ड फीट इंडिया’ची सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंंद शाळीग्राम यांनी दिली. या वेळी क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डॉ. दीपक माने हेही उपस्थित होते. ‘मिशन यंग अॅन्ड फिट इंडिया’ या कार्यक्रमात शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निमंत्रित केलेले महाराष्ट्रातील सुमारे २५० शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष आणि क्रीडा संचालक सहभागी होणार आहेत. केवळ निमंत्रितांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच, मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. मीनल सोहनी यांची मनोगते होतील. ..............सहा महिन्यांपासून मैदान उपलब्ध करण्यात अपयश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानामध्ये चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपट सेटने मैदानाचा मोठा भाग व्यापला आहे. विद्यार्थ्यांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करूनही अद्याप ते उपलब्ध होऊ शकलेले नाही. एकीकडे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन यंग अॅन्ड फीट इंडिया’ हा कार्यक्रम राबविला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावरील अतिक्रमण दूर करण्याकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष होत आहे. या विसंगतीकडे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांचे लक्ष वेधले असता कुलगुरू डॉ. नितीन करमळकर याबाबत उत्तर देऊ शकतील असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठात सोमवारी रंगणार ‘सचिन’ची मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 8:41 PM
तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून‘मिशन यंग अॅन्ड फीट इंडिया’ची सुरुवात केली जाणार आहे.
ठळक मुद्देमिशन यंग अॅन्ड फिट इंडिया : खेळांना उत्तेजन देण्यासाठी उपक्रमप्रसिध्द क्रीडा समीक्षक सुनंदन लेले तेंडुलकर यांची मुलाखत घेणार नागराज मंजुळे यांच्या चित्रपट सेटने सहा महिन्यांपासून मैदान उपलब्ध करण्यात अपयश