पुणे : सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांनी गायलेल्या मुसाफिर हूँ यारो... तेरे चेहरे में वो जादू है... ये शाम मस्तानी... कोरा कागज था ये मन मैरा... नदियाँ से दरीयाँ... अशी अवीट गीते सलग १७ तास गाऊन गायक प्रशांत नासेरी यांनी सचिनला खास गीतमय शुभेच्छा दिल्या. हा एक विक्रम ठरला आहे. लाडक्या सचिन तेंडुलकर याच्या ४४व्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांची १६१ हून अधिक गाणी गायिली. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व प्रशांत नासेरी यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ८ला ‘हरफनमौला किशोरकुमार’ या संगीत गाण्याच्या कार्यक्रम सादरीकरणाला प्रसिद्ध गायक प्रशांत नासेरी यांनी सुरुवात केली. रात्री बाराच्या सुमारास हा विक्रम पूर्ण झाला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, संदीप पंचवाटकर, जितेंद्र भुरुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. काश्मीरहून आलेल्या गायिका इंदू बाला, नीलेश जेधे, विवेक थिटे, अनन्या महापात्रा, नरेंद्र शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ड्वीट गाण्यांसाठी सुवर्णा माटेगावकर, मधुरा दातार, जितेंद्र भुरुक, जितेंद्र अभ्यंकर, श्रावणी रवींद्र, राधिका अत्रे, धवल चांदवडकर, रेवा तिजारे, इंदू बाला (जम्मू) यांनी साथ दिली. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरची सहमती मिळाली असून, त्याने कार्यक्रमाला शुभेच्छाही दिल्या आहेत, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सचिनला संगीतमय शुभेच्छा
By admin | Published: April 26, 2017 4:17 AM