पुणे : पुण्यातल्या गजबजलेल्या सदाशिव पेठेतील जीवन मेडिसेल या औषधांच्या हाेलसेल विक्री करणाऱ्या दुकानाला पहाटे 4 च्या सुमारास आगी लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले असून औषधांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शाॅकसर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील सदाशिव पेठेतील पाटे डेव्हलपर्सच्या इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या जीवन मेडिसेल या औषधांची हाेलसेच विक्री करणाऱ्या दुकानाला पहाटे चार वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच तातडीने भवानी पेठ, कसबा आणि एंरंडवणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे दुकानाचे शटर वितळल्याने कटरच्या सहाय्याने ते कापण्यात आले. तसेच पाण्याचा मारा करत आग आटाेक्यात आणण्यात आली. यात कुठलिही जीवीत हानी झाली नसली तरी, माेठ्याप्रमाणावर औषधांचे तसेच आर्थिक नुकसान झाले. तसेच आगीच्या झळांमुळे इमारत देखील काळवंडली. दरम्यान एकीकडे आग विझवत असताना दुसरीकडे अग्निशमन दलाचे चार जवानांनी इमारतीतील रहिवाश्यांना सुरक्षितरित्या खाली आणले आणि इमारत रिकामी केली. अग्निशमन दलाचे अधिकारी विजय भिलारे, राजेंद्र जगताप आणि नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग विझवण्यात आली.
अग्निशमन यंत्रणा चालू असती तर...ज्या इमारतीत आग लागली हाेती, तेथे अग्निशमन यंत्रणा हाेती परंतु ती नादुरुस्त हाेती. त्यामुळे आग लागल्यानंतर तिचा काहीही उपयाेग झाला नाही. अनेक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असते परंतु तिची देखभाल दुरुस्ती केली जात नाही, त्यामुळे ती बंद अवस्थेत असते. या इमारतीतील यंत्रणा सुरु असती तर आग लवकर आटाेक्यात आणता आली असती तसेच नुकसान कमी झाले असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची वेळेवर देखभाल दुरुस्ती करण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.