‘लोकमत’च्या व्यासपीठावर पुणेकरांशी साधणार संवाद
पुणे :
प्रदूषण रोखून माती संवर्धनाचा संदेश देण्यासाठी २६ देशांचा दाैरा करून ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू मंगळवारी (दि. १४ जून) पुण्यात येत आहेत. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर पुण्यातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. यावेळी माती वाचवाचा (सेव्ह सॉईल) जागर होणार आहे.सद्गुरू संपूर्ण जगभर यात्रा करून माती वाचवाचा संदेश देत आहेत. यांची ही जागतिक यात्रा १४ जून रोजी पुण्यात येत आहे. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर माती संवर्धनाचा गजर होणार आहे. जगातील विविध देशांतील साडेतीन अब्ज लोकांशी संवाद साधत जगभरातील सरकारांनी मातीचे पुनरुज्जीवन करावे आणि ऱ्हास रोखून माती संवर्धनासाठी धोरण तयार करावे हा या मोहिमेचा उद्देश आहे. सद्गुरू हा संदेश देत दुचाकीवरून (सोलो बाईक राईड) फिरत आहेत. मातीचे आरोग्य चांगले राहिले तरच आपलेही आरोग्य चांगले राहणार असल्याचे पटवून देत आहेत. वाढत्या वाळवंटीकरणावर जागरूकता निर्माण व्हावी आणि मातीचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी ही मोहीम सुरू आहे.
आताच्या वाढत्या लोकसंख्येला अन्नपुरवठा करायचा असेल तर चांगली जमीन हवी; तरच पिके चांगले येईल. मातीचा कसच संपत आहे. पावसाच्या माऱ्यामुळे तसेच वाऱ्याच्या झोतामुळे आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सूक्ष्म कण, तसेच माती वाहून जाते. सर्वसाधारणपणे २·५ सेंमी. जाडीचा मातीचा थर तयार होण्यास सुमारे ४०० ते १,००० वर्षांचा काळ लागतो. जमिनी नैसर्गिक आवरणाखाली राखल्यास माती वाहून जाण्याची क्रिया मंद होते आणि त्यामुळे नैसर्गिक समतोल राखला जातो.
माती संवर्धनाचा संदेश देत सद्गुरूंनी सोलो बाईक राईड करत २७ देशांत १०० दिवस यात्रेचा संकल्प केला होता. या देशातील नागरिक आणि नेत्यांपर्यंत माती वाचवाचा संदेश पोहोचवित आहेत. २६ देशांना भेट देऊन नुकतेच त्यांचे जामनगर येथे भारतात आगमन झाले. भारतातील विविध राज्यांत भेट दिल्यानंतर १४ जून रोजी ते पुण्यात येत आहेत. यानिमित्ताने ‘लोकमत’ने पुण्यात सद्गुरूंच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आपल्या अन्नाची गरज पूर्ण करणारी धरणी माता सुजलाम सुफलाम राहावी, यासाठी माती संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे. ईशा फाऊंडेशनचे अध्यक्ष सदगुरु यांनी सुरू केलेली सेव्ह सॉईल मोहीम संपूर्ण जगात पोहोचली आहे. भारतामध्ये तर ही मोहीम विशेष महत्वाची आहे. 'लोकमत'ने या मोहीमेसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या मोहीमेत आपण सर्वांनी जोडले गेले पाहिजे.- अभय लोढा, अध्यक्ष, टॉपवर्थ रिअॅलिटीईशा फाऊंडेशनमध्ये वास्तव्यात सद्गुरु यांनी स्वतः माती संवर्धनाचे प्रयोग केल्याचे मी अनुभवले आहे. आता ते जगभर हा संदेश पसरवित आहेत. निसर्गाने दिलेली माती ही आपल्या मालकीची नसून आपण ट्रस्टी आहोत. भावी पिढ्यांकडे आपण हा वारसा पोहोचवायला हवा. प्रत्येकाने कृतिशील प्रयत्न करायला हवेत. तरच जग वाचेल.- डॉ. संजय चोरडिया, संस्थापक-अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप
निसर्ग संवर्धन करायचे असेल तर मातीशी नाते जोडायला हवे. आपले शरीर देखील पंचमहातत्त्वांनी बनले असून, त्यामध्ये पृथ्वी हा एक घटक आहे. त्यामुळे मातीशी सतत जोडणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते.- अतुल गोयल, व्यवस्थापकीय संचालक, गोयल गंगा ग्रुप
हवामान बदलाचे विपरित परिणाम आपण सध्या पाहत आहोत. त्यामुळे मातीच्या होणाऱ्या हासाकडे आपल्याला गांभीर्याने पाहावे लागणार आहे. सदगुरू यांनी सुरू केलेली सेव्ह सॉईल मोहीम संपूर्ण देशात पोहोचायला हवी. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करायचा असेल तर चांगली जमीन हवी, तरच पिके चांगले येतील. शेतजमिनींचा योग्य वापर करून तिचा कस राखणे अत्यंत आवश्यक बनले आहे; पण अनेक कारणांमुळे जमिनीची उत्पादनक्षमता घटत आहे. मातीमधील कसच संपत आहे. हा कस वाढविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी करायला हवा. ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या माध्यमातून शाळांमध्ये या विषयावर जागृती करण्यात येणार आहे. भविष्यातील सजग नागरिक असलेले विद्यार्थी माती संवर्धनाचा वसा आपल्याकडे घेतील. सदगुरू यांच्या मोहिमेला बळ देतील.- उषा काकडे, अध्यक्ष, ग्रॅव्हिटास फाउंडेशन
प्रवेश फक्त आमंत्रितांना असला तरी ही एक्स्लुसिव्ह मुलाखत आपण लोकमतच्या फेसबुक पेजवर आणि यू-ट्युब चॅनलवर LIVE पाहू शकता.