पुणे : “मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर एका धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे असे समजतो. पृथ्वी एक केक आहे आणि त्या केकचा एक तुकडा घेऊन आपली जबाबदारी संपली असे समजत असाल तर ते योग्य नाही. सुक्ष्मजीवांचे जीवन ही एक जागतिक प्रक्रिया आहे. त्यामुळे माती वाचवा (सेव्ह सॉईल) ही चळवळ सध्याचे धोरण बदलण्याचा एक जागतिक प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी केले.
जगातील २६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरू माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी लोकमतच्या व्यासपीठावर पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी लोकमतचे संपादक मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्राविटास फाउंडेशनचया अध्यक्ष उषा काकडे, गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, टॉपवर्थ ग्रुपचे अध्यक्ष अभय लोढा यावेळी उपस्थित होते.
सद्गुरु म्हणाले, माती आपल्या भौतिक अस्तित्वाचा स्त्रोत आहे. तो केवळ अन्न व पोषणाबाबत नसून ती एक क्रांतीकारी प्रक्रिया आहे. मातीत अब्जावधी सुक्ष्मजीव असतात. त्यांची अनेक रुपे पाहायला मिळतात. त्यांचे जीवन एक जटील प्रक्रिया आहे. ती वाढत गेल्यानंतर एक जीवन तयार होते. त्यामुळे मानवाच्या जीवनाचे मूळही त्यातच आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी कवक, अल्गी यांनी सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करण्याचे शोधून काढले. त्यालाच आपण प्रकाशसंश्लेषण म्हणतो. त्यावेळी वातावरणात केवळ एक टक्का ऑक्सिजन होता. आत तो २१ टक्के इतका आहे. हे केवळ प्रकाशसंश्लेषणामुळे झाले. मात्र, गेल्या हजार वर्षांत पृथ्वीवरील ८५ टक्के प्रकाशसंश्लेषण नष्ट झाले आहे. सध्या जगातील ७६ टक्के जमिनीवर ही प्रक्रिया थांबली आहे. तुमच्या शहरात अनेक झाडे असतील मात्र, त्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या काही फरक पडत नाही. त्यामुळे माती आणि त्यातील सेंद्रीय क्रिया हे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. आज तुम्ही जे आहात ते त्याचाच परिपाक आहे.”
''माती ही आपली माता पान आज आपण मातीला साधन (रिसोर्स) मानायला लागलो आहोत, अशी खंत व्यक्त करत सद्गुरू म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मातेला साधन समजणार त्या दिवशी तुम्ही त्यादिवशी तुमच्यातील माणुसकी संपेल. अनेक देशांनी मातीला एक निष्क्रिय वस्तू म्हणून गृहित धरले आहे असे जगभर फिरताना लक्षात आले आहे. मात्र, माती ही विश्वातील सर्वांत मोठी सजीव प्रणाली आहे. आपल्या देशातही हीच परिस्थिती आहे. ती सजीव असून पुढच्या पिढीसाठी तुम्हाला तिला जिवंत ठेवावे लागणार आहे.”
जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज
तुम्ही शांतता सौहार्दाबाबत सांगतात. सध्या देशात व जगभर असहिष्णुता व द्वेषाचे वातावरण आहे. त्यावर तुम्ही काय उपाय सुचवाल, या प्रश्नावर ते म्हणाले, “देशांमधील तसेच समाजातील तणावाबाबत बोलायचे झाल्यास सध्याचे वातावरण हे गेल्या हजार वर्षांपेक्षा चांगले आहे. त्यासाठी इतिहास तपासा. आता स्थिती बदलली आहे. तेव्हाच्या तुलनेत आपण आता शांततेत व सौहार्दाने जगत आहोत. सध्याचा तणाव फक्त टीव्हीच्या स्टुडियोंमध्ये दिसतो. तुम्ही जर पुण्याच्या रस्त्यांवरून फिरलात तर तुम्हाला हा तणाव दिसणार नाही. देशातही तीच स्थिती आहे. प्रत्येक देशात काही विघ्नसंतोषी असतात. ते त्यांच्या पद्धतीने वागत असतात. त्यांना अवास्तव महत्त्व दिले जाते. हे चुकीचे आहे. त्यामुळे मीडियाने देशात व समाजात घडत असलेल्या सकारात्मक गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे.
जखमांवरील खपल्या काढू नका
आपल्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. मी लहान असताना ६० च्या दशकात देशात दर दोन महिन्यांनी देशात जातीय दंगली घडत होत्या. गेल्या २० वर्षांत अशा घटना घडल्या नाहीत. एखाद दुसरी घडली असेल. मात्र, नियमित घडलेल्या नाहीत. याचाच अर्थ तणाव कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने या तणावावरील उपायांबाबत विचार केला पाहिजे. जुन्हा जखमांवरील खपल्या काढत बसू नये. या देशात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्या बऱ्या होऊ द्या व पुढे जाऊयात, असे आवाहन सद्गुरू यांनी केले.
विजय दर्डा म्हणाले, सदगुरुंचा तरुणांसारखा उत्साह थक्क करणारा आहे. जनजीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. राष्ट्रप्रेम आणि विश्वप्रेमातून त्यांनी अनोखे चैतन्य निर्माण केले आहे. लहान मुले, मोठी माणसे असोत, राजकारणी असोत की कलाकार, प्रत्येक संवेदनशील माणसाला त्यांनी सामवून घेतले आहे. झोपलेल्या समाजाला, व्यवस्थेला सदगुरुंनी जागे केले आहे. आपल्या देशात सदगुरुंची कमतरता नाही. मात्र, ख-या अर्थाने सदगुरु होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सदगुरुंनी कायम कृतीला महत्व दिले आहे.संपूर्ण विश्व प्रकाशमान करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सदगुरुंच्या ‘माती वाचवा’च्या चळवळीत लोकमत परिवारही सहभागी आहे. कोरोना काळात रक्तदानाच्या माध्यमातून लोकमतने राज्यभरात मोठी चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि माती वाचवणे यासाठी ‘लोकमत’ तफेर् यापुढेही नक्कीच पुढाकार घेतला जाईल.