पुणे: साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान हे नाव ३० वर्षांपूर्वी दिले गेले. ते बदलण्याची मागणी करणे चुकीचे नाही, मात्र त्याची एक पद्धत आहे. महापालिकेकडे पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता व जर मनपा नाव बदलत नाही असे लक्षात आले तर समाजमाध्यमावर दाद मागणे अधिक योग्य ठरले असते, असं मत फुले साहित्याचे जेष्ठ अभ्यासक हरि नरके (hari narke) यांनी मांडले आहे. यापूर्वी अॅड असिम सरोदेंनी फेसबूकवर पोस्ट करून उद्यानाच्या नावातील साध्वी हा शब्द काढण्याची मागणी केली होती.
प्रा. हरी नरके यांनी समाजमाध्यमांवर उद्यानाचे नाव बदलण्याच्या होत असलेल्या मागणीला फेसबूकवर पोस्ट करत उत्तर दिले आहे. ज्यांनी १९९१ साली नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या. त्याकाळात क्रांतीज्योती वा ज्ञानज्योती हे शब्द फारसे प्रचलित नव्हते. ज्यांनी हे नाव दिले त्यांचा हेतू चांगला होता. त्यावेळचा सांस्कृतिक संदर्भ तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण हा ठराव देणारे लोक भले आहेत, त्यांना ज्यांनी प्रवृत्त केले त्यांनीच (जेव्हा सावित्रीबाईंना सगळे विसरले होते) तेव्हा त्यांचे स्मरण कायम ठेवले, हे विसरून कसे चालेल?
आज साध्वी शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झालेला असला तरी तेव्हा तो तसा नव्हता. शिवाय पारंपरिक शब्द टाळण्याइतके बहुजन काटेकोर नव्हते. दक्ष नव्हते. त्यांचे सांस्कृतिक भान तेव्हाही आजागृत होते नी आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. विरोध करणारे सापसाप म्हणत भुई धोपटत सुटले. दुसरी बाजू समजून न घेता हेत्वारोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय? असाही प्रा. हरी नरके यांनी फेसबूकच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.