पिंपरी : घरगुती वादातून मित्रांच्या मदतीने साडूचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून दिला होता. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत साडूसह तिघांना जेरबंद केले. तर, पत्नी आणि मेहुण्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विनोद विठ्ठल उपदेशी (२८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा साडू राहुल नामदेव डोंगरे (वय २४, रा. पिंपळेगुरव), त्याचे मित्र सनी प्रकाश माने (वय २०), संकेत अशोक खंडागळे (वय २०, रा. शिवाजीनगर) यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, प्रवीण आणि राहुल हे दोघे नात्याने एकमेकांचे साडू आहेत. प्रवीण याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. प्रवीण आणि त्याच्या पत्नीचे नेहमी कौटुंबिक कारणातून भांडणे होत होती. यावरून दोघांनीही पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी प्रवीण घरी आले नाही. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या भाच्याने पिंपरी पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर प्रवीणची दुचाकी पोलिसांना चिंचवड येथील मॉलनजीक सापडली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (प्रतिनिधी)- पोलिसांनी शुक्रवारी संशयावरून प्रवीणचा साडू राहुल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्रवीणबाबत विचारणा केली असता तो उडवाउवीडीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच राहुलने हकिकत सांगितली. मित्रांच्या साथीने प्रवीणचे अपहरण करून गळा आवळून त्याचा खून केल्याचे कबूल केले. प्रवीणचा मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. प्रवीण यांचा मृतदेह बाहेर काढला.
अपहरण करून साडूचा केला खून
By admin | Published: August 28, 2016 4:18 AM