पुणे : उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे गावी व पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुणेरेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी होत आहे. पण, प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. बॅग स्कॅनर बंद असून, प्रवाशांची कोणतीही तपासणी होत नसल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे सध्या रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल्ल आहे. दानापूर, झेलम, नागपूर, हावडा अशा सर्व गाड्यांना तुफान गर्दी आहे. प्रवासी काही तास अगोदर येऊन पुणे स्टेशन येथे ताटकळत थांबत आहेत. प्लॅटफॉर्मबरोबरच बाहेरचा आवारदेखील प्रवाशांनी फुलून गेला आहे. तसेच, चौकशी, तिकीट काउंटरवर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे.
सुरक्षेकडे दुर्लक्ष
रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. स्टेशनमध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची प्रवाशांची तपासणी होत नाही. तसेच, बॅग स्कॅनरदेखील बंद असल्याचे दिसून आले. तसेच, इतर ठिकाणांहून स्टेशनमध्ये प्रवेश करणाऱ्यांची कोणतीही तपासणी केली जात नाही. स्टेशनवर पाकीटमारांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या महिन्यात ८५ पाकीटमारीच्या घटनांची नोंद आहे. नोंद न झालेल्या घटना वेगळ्याच आहेत. या घटना रोखण्यात रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.