पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने शाळांनी आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांनी देखील याचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. पोलिस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
पाेलिस आयुक्त म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवाला, तसेच शारीरिक आणि मानसिक छळाला आळा बसावा. यासाठी स्कूल बसचालकांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलिस यांच्यात समन्वय आवश्यक आहे. तसेच स्कूल बसची वारंवार तपासणी करावी. शालेय परिवहन समितीनेही बसचे वाहनचालक प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर वाहन आणि चालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
या बैठकीस वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, बारामतीचे उप प्रादेशिक अधिकारी राजेंद्र केसकर, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.
शाळेनेच घ्यावी वाहतुकीची जबाबदारी
वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले की, विद्यार्थी हा शाळेचा महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी शाळेनेच घेणे गरजेचे आहे. वाहतुकीसंदर्भात शाळेचे ऑडिट करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षक, वाहतूकदार यांनी चुका होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय, खासगी शाळांमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन झाल्याची खात्री करावी, असे सांगितले.
जिल्ह्यात १०,२७० स्कूल बस
जिल्ह्यात तब्बल १० हजार २७० स्कूल बस आहेत. याबाबत ५ हजार ९२१ शाळांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी, यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान २,२१४ स्कूल बस आणि १,४७८ अन्य वाहनांची तपासणी केली. या तपासणीत ५७१ स्कूल बस आणि ३७९ अन्य वाहने दोषी आढळली. या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबाबत १ कोटी १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.