धनकवडी : सातारा रस्ता अर्बन डिझाईन कामाला बालाजीनगर परिसरात होणारा विलंब पीएमपी प्रवाशांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. भरवाहतुकीच्या मार्गावर उभे राहून बसची प्रतीक्षा अत्यंत धोकादायक पद्धतीने करावी लागत आहे. यासाठी प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद मिरविणारी पीएमपी आणि सुस्त पालिका प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून तत्काळ सुरक्षित बस थांबे उभारावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.सातारा रस्ता पुनर्विकासाचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. दरम्यान, या कामाचा निधी संपला, तो निधी मिळाल्यावर दिवाळीनंतर कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले. दिवाळी होऊन दोन महिने होऊन गेले तरी सर्वसामान्य प्रवाशांच्या नशिबी बस थांबे तर सोडाच, परंतु सुरक्षित उभे राहण्यास जागाही नाही. उपलब्ध, शिल्लक, मिळेल तेथे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी भररस्त्यात मध्यभागी उभे राहून बसची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे अनेकदा धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. असे किती दिवस अजून जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.मध्यंतरी सातारा रस्ता पुनर्विकासाचे रखडलेले काम १८ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिले होते. मात्र हे आश्वासन फोल ठरल्यानंतर माझी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी महापौरांना माहिती दिली. यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी २३ एप्रिलला कामाची पाहणी केली. आणि ३१ मेपर्यंत काम पूर्ण केले नाही तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे संथ चाललेल्या कामाला गती मिळाली. मात्र महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या सूचना आणि नवीन बस थांबे उभारले जाईपर्यंत प्रवाशांना थांबण्यासाठी तात्पुरते शेड उभारा, अशा केलेल्या मागणीला केराची टोपली दाखवली.दरम्यान, बीआरटीच्या दहा बस थांब्यापैकी तीनच बस थांबे उभारण्याचे काम बाकी आहे. पैकी के. के. मार्केटजवळील अहिल्यादेवी चौक व धनकवडी फाट्याजवळील बालाजीनगर बस थांबा ही दोन गर्दीच्या ठिकाणांचा समावेशआहे.या ठिकाणी बस थांबे उभारण्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या ठिकाणी प्रवाशांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका कधी होणार, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.३१ डिसेंबर १८ पर्यंत पुनर्विकासाचे आश्वासन१ ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. अजूनपर्यंत हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता दिसून येत नाही.२ हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पुनर्विकासाचे काम कधी होणार आणि परिसर कोंडीमुक्त कधी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.पुनर्विकासाच्या कामास विलंबस्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाच्या सुरू असलेल्या पुनर्विकासाचे कामाला विलंब सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळेच होत आहे. महापालिकेचा ठेकेदारावर वचक नसल्याने त्यांची मनमानी चालू आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण न करता मुदतवाढ मागितली जात आहे. हा विलंब नागरिकांच्या जिवावर बेतणार आहे. या ठिकाणी जर एखादी दुर्घटना घडली तर महापालिकेचा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनाच जबाबदार धरले गेले पाहिजे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर नवीन वर्षात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिला आहे.- दत्तात्रय धनकवडे,माजी महापौर
प्रवाशांच्या सुरक्षिततेची लागली वाट, पीएमपी थांबे मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:37 AM