- अविनाश ढगेपिंपरी : देशात तयार होत असलेल्या नवीन वाहनांची सुरक्षा प्रमाणीकरण चाचणी बुधवारपासून चाकणमधील एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) आणि दिल्लीतील आयसीएटी (इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) या दोन संस्था करणार आहेत. चाचणीनंतर या दोन संस्थांकडून भोसरीतील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला (सीआयआरटी) अहवाल दिला जाईल. त्याआधारे वाहनांना ‘ स्टार रेटिंग ’ दिले जाणार आहे. यासाठी ग्लोबल इनकॅप आणि सीआयआरटी यांच्यात करार झाला आहे.
रस्ते अपघातात कमीत-कमी हानी व्हावी यासाठी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सुरक्षा सुविधा दिल्या जात आहेत. त्याआधारे वाहनांना ‘ स्टार रेटिंग ’ दिले जाते. सध्या देशातील वाहन निर्मिती कंपन्यांना यूकेतील ‘ ग्लोबल इनकॅप ’ संस्थेद्वारे चाचणी करून सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते. पण, आता देशातच वाहनांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. पण, सुरवातीला या चाचण्या ऐच्छिक असणार आहेत. केंद्र सरकारने भोसरीतील सीआयआरटी संस्थेची निवड केली आहे.
स्टार रेटिंग म्हणजे काय ?
येथील वाहन सुरक्षा मानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतील. वाहन निर्माता कंपन्यांना चाकण येथील आयआरएआय आणि दिल्लीतील आयसीएटी या दोन संस्थांकडे अर्ज करावा लागेल. नंतर मोटारी या संस्थेकडे पाठवाव्या लागतील. यासाठीचा खर्च कंपन्यांना करावा लागेल. तीन स्तरावर चाचणी करून दोन्ही संस्थांकडून मान्यता मिळाल्यानंतर वाहन उद्योग मानकानुसार सीआयआरटीकडून सुरक्षा रेटिंग दिले जाणार आहे. वाहनांना शून्य ते पाच स्टार दिले जातील. सर्वांत कमी रेटिंग किंवा स्टार असलेल्या मोटारी अपघातात सुरक्षित मानल्या जात नाहीत.तीन स्तरावर चाचणी
प्रौढ व्यक्तीची सुरक्षा :
वाहनांत समोरच्या आसनावर डमी चालक आणि सहप्रवासी बसवून गाडी समोरच्या बाजूने धडकवली जाईल. यानंतर कोणास किती इजा झाली, याआधारे वाहन सुरक्षित आहे की नाही हे तपासले जाईल.मुलांची सुरक्षा : वाहनांना समोर आणि बाजूने टक्कर झाल्यास, मागील आसनावर बसलेली डमी मुले किती सुरक्षित आहेत, याची चाचणी होईल.सेफ्टी फीचर्स : वाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअरबॅग, सेफ्टी बेल्ट, बॅक सेन्सर, कॅमेरा, स्पीड अलर्ट बसविले जातात. पण, अपघाताच्या वेळी ते काम करतात की नाही, त्याचा वापर होतो का, याची चाचणी केली जाईल.
ग्राहकांना स्टार रेटिंग याच्या आधारावर अधिक सुरक्षित कार निवडण्याचा पर्याय मिळेल. सध्या क्रॅश चाचणीसाठी वाहने परदेशात पाठवावी लागतात, तिथे अशी चाचणी करण्याचा खर्च अधिक आहे. पण, आता वाहनांची क्रॅश चाचणी भारतातच होणार असल्याने वाहन उत्पादक कंपन्यांचा खर्च कमी होईल.- डॉ. टी. सूर्यकिरण, संचालक, सीआयआरटी