लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षितेबाबत दुर्लक्ष केले जाणार नाही. महिलांची सुरक्षा आणि सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, याकडे आपले वैयक्तिक लक्ष आहे, अशी ग्वाही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना दिली.
पुणे पोलीस आयुक्तांनी इस्टाग्रामद्वारे पुणेकरांशी थेट संवाद साधला. या वेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. ४ व ५ मे दरम्यान त्यांनी संपूर्ण दिवस इन्स्टाग्रामद्वारे “Ask Me Anything” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमात ९ हजार ७८६ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच २५० हून अधिक नागरिकांनी प्रश्न विचारले. त्याला ७ हजार ८५० पेक्षा अधिक नागरिकांनी लाइक्स केले.
नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मुख्यत: एसपीओ, सायबर फसवणूक व वाढती गुन्हेगारी याचा समावेश होता.
सावत्र आईने केलेल्या मानसिक छळाचा सामना कसा करु, असा प्रश्न विचारण्यात आला. आपणास काही अप्रिय अनुभव आले. पारदर्शक संवादामध्ये बऱ्याच समस्यांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य असते, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
सकारात्मक कसे राहायचे यावर उत्तर देताना ते म्हणाले, सकारात्मकता ही मनाची अवस्था आहे. आपल्याला आवडलेल्या गोष्टींमध्ये व्यस्त रहा. काही तरी नवीन शिका, कुटुंबाला आणि जुन्या मित्रांशी संवाद साधा, असे उत्तर दिले.
पोलीस घेत असलेल्या परिश्रमावर आम्हाला शहरातील नागरिकांचे सतत प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हेच आमच्यासाठी परिश्रमाचे फळ आहे, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.