पुणे : सिंहगड किल्ल्यावर पुणे महापालिका ३० मीटर उंचीचा ध्वज स्तंभ उभारून भगवा ध्वज फडकविणार आहे. याचबरोबर स्तंभाभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करून स्तंभ परिसराचे सुशोभीकरणही करणार असून, यासाठी १ कोटी रुपये खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली़
समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़ सिंहगड किल्ल्यावर भगवा ध्वज उभारणे व विद्युत रोषणाई करणे हा प्रकल्प पुणे महापालिका हद्दीबाहेरचा असला तरी त्या ठिकाणी पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात जातात. यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ८९ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला. आमदार भीमराव तापकीर यांनी याकरिता सन २०२०-२१ च्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात याबाबत प्रस्ताव दिला होता़ यानुसार उपलब्ध तरतुदीनुसार हा खर्च करण्यात येणार आहे़
या ध्वज उभारणीकरता वन विभागासह, पुरातत्त्व खात्यांसह शासनाच्या विविध खात्यांची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे़ सिंहगड किल्ला हा राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे व किल्ल्याचे क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात असल्याने या प्रकल्पासाठी शासनाने यापूर्वीच मास्टर प्लॅन तयार केला आहे़
चौकट
नरवीर तानाजी मालसुरे समाधिस्थळाचा विकास
नरवीर तानाजी मालुसरे यांची मूळ समाधी उजेडात आल्याने पूर्वीच्या कामात बदल केला जात आहे. चौथऱ्यावरील मालुसरे यांच्या पुतळ्यासाठी नव्याने चौथरा व मेघडंबरीचे काम करणे, समाधिस्थळाकडील रस्ता दगडी बांधकामात अडीच मीटर रूंदीचा करणे आणि परिसर सुशोभीकरणासाठी या ७५ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून हा खर्च केला जात आहे.
--------------------------------