मावळ हा आपला बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना आजच्या निकालाने मोठाच धक्का दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात आणि हाक देताच हजारो कार्यकर्ते पुढ्यात अशा ठेक्यात वावरणार्या राष्टÑवादी काँग्रेसला मतदारांनी पार तिसर्या क्रमांकावर फेकले. हे नाकारलेपण काका-पुतण्यांनी स्वत:हून ओढवून घेतले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने सलग दुसर्यांदा भगवा फडकावत आपली ताकद पाचपट केली आहे. याला साथ मोदी लाटेची असली, तरी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली एकजुट महत्त्वाची ठरली आहे. शेतकरी कामगार पक्ष व महाराष्टÑ नवनिर्माण सेना या पक्षांंचे अस्तित्व, तर नगण्य असल्याचेही या निकालातून दिसते आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागले होते. याची अनेक कारणे ठरली; पण यातील काहींचा विचार करायचा झाला, तर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये लागलेला सुरूंग! ‘मावळचा खासदार’ म्हणून आमदार लक्ष्मण जगताप हे नाव तीन वर्षांपूर्वीच पक्षाने ठरविले होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि जगताप यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. यासाठी कारण देताना त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न महापालिकेतील व राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून राष्टÑवादीने सोडविला नाही, असा आरोपही केला. त्यांच्या उमेदवारीच्या नकाराने पक्षाची धावपळ उडाली. कारण, उमेदवारी स्वीकारण्यास पुढे कोणीच येईना. ‘उमेदवारी घ्या हो,’ अशी विनंतीही अजित पवारांना करावी लागली, तरीही कोणीही तयारी दर्शविली नाही. यामागील कारण म्हणजे काका-पुतण्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दाखविलेला अविश्वास. ही त्यांच्या पराभवाची पहिली पायरी ठरली. बारणे यांच्या विजयात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली प्रचंड एकजुट महत्त्वाची ठरली. बारणे सुरुवातीपासून अनधिकृत बांधकामधारकांच्या पाठीशी राहिले. त्यांच्यासाठी सतत महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत आंदोलने केली. स्थानिक पातळीवर सामान्य माणसामध्येही त्यांची अतिशय चांगली प्रतिमा राहिली. कोठेही डाग नसल्याचा लाभ त्यांना झाला. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत त्यांनी मोठा संपर्क वाढविला होता. याचा फायदा त्यांना झाला. ऐन निवडणुकीत विद्यमान खासदार गजानन बाबर व त्यांच्या गटाने शिवसेना सोडली होती. तरीही राष्टÑवादीला कंटाळलेले, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर नाराज असलेले, आता बदल हवा, असा मोठा मतप्रवाह तयार झाला होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला होता. मतदान झाल्या दिवसापासून त्यांच्याच विजयाविषयी सर्वत्र चर्चा होती. सार्यांना प्रतीक्षा केवळ मोदी लाटेमुळे त्यांना किती मताधिक्य मिळणार याची! यातूनच सहाही विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर राहून तब्बल १ लाख ५७ हजार ३९७ मताधिक्यांनी ते विजयी झाले.
पवारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा फडकला भगवा
By admin | Published: May 17, 2014 6:08 AM