पुणे : कोल्हापूरच्या भवानी मंडप प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ७५ स्वराज्यरथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... शिवगर्जना ढोल-ताशा पथकाचा रणगजर... पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक, सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर... हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवजयंतीनिमित्त शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याच्या सुरुवातीला लालमहाल चौकात अमर जवान स्तंभ उभा करून पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समितीचे संस्थापक अमित गायकवाड, श्रीमंत छत्रसाल महेंद्रसिंग महाराज, राघवेंद्रसिंग महाराज बुंदेला, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, बीव्हीजीचे ग्रुपचे हणमंत गायकवाड, आमदार शशिकांत शिंदे, उद्योजक युवराज ढमाले, रोहित पवार, प्रवीण तरडे, टीम मुळशी पॅटर्न, समन्वयक सुनील मारणे तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ-शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मिरवणुकीचे यंदा ७ वे वर्ष आहे.४सोहळ्यामध्ये सरसेनापती वीर बाजी पासलकर, हैबतराव शिळीमकर, रणमर्द संभाजी कोंढाळकर, सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या पुतळ्याचे व बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार यांच्या तैलचित्राचे अनावरण यावेळी झाले.शिवाजी महाराजांचा जयजयकारपुणे - हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा अखंड जयजयकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करत, पारंपरिक वाद्य आणि शिवभक्तांच्या उत्साही वातावरणात पुणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भवानी मातेचे पूजन करून व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता भवानी माता मंदिर भावनीपेठ या ठिकाणाहून सुरू झालेल्या या मिरवणुकीचे विसर्जन एसएसपीएम कॉलेज जवळ झाले. या मिरवणुकीसाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाजेड, श्रीनाथ भिमाले, अर्चना पाटील, अविनाश बागवे, अजय खेडेकर, कमल व्यवहारे, मराठा सेवा संघ अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते.