"साहेब अन् मी तेव्हाही वेगळे नव्हतो अन् आताही..."; अजित पवारांच्या भाषणावर टाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:22 PM2023-08-01T14:22:47+5:302023-08-01T14:25:33+5:30
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही भाजपसोबत येण्याची विनंती केली होती
पुणे/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही सत्तेत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतल्याने एकनाथ शिंदेंनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दुसरा मोठा भूकंप देशाने पाहिला. अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवारांचाच पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत, अजित पवारांना पाठिंबा नसल्याचे म्हटले. तसेच, या बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन आपण जनतेशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्यापही काहींना शरद पवार व अजित पवार एकत्रच असल्याचे वाटते. त्यातच, अजित पवार गटाकडून सातत्याने तसे दाखवण्याचा प्रयत्नही केला जातो.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही भाजपसोबत येण्याची विनंती केली होती. मात्र, पवारांनी ही विनंती फेटाळून लावत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला होता. मात्र, शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, तेच आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे अजित पवार गटाकडून सांगण्यात येते. आता, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा तसेच संकेत दिले आहेत. माजी आमदार स्व. बाबुराव पाचरणे यांच्या स्मारक उद्घाटनासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी, बोलताना अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली.
मी आज इकडे येण्यासाठी सकाळी साडे पाच वाजताच निघालो होतो, लवकरच कार्यक्रम आटोपून पुढे जावं असं मनात होतो. तर, दादा तुम्ही सकाळी ७ वाजता कार्यक्रमाला जाता, पण तिथं लोकं कशी येतात? असं मला अनेकजण विचारतात. त्यावर, आपण लोकांना कशा सवयी लावतो, त्यावर ते अवलंबून असतं. आपल्याला पवारसाहेबांनी सकाळपासून कामाची सवय लावल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, यावेळी जुन्या आठवणी सांगताना त्यांनी सध्या राजकीय परिस्थितीवरही अलगदपणे भाष्य केलं.
''अगदी सुरुवातीच्या काळात, पोपटरावांनाही आठवत असेल. पोपटराव हे साहेबांचे उमेदवार आणि बाबूराव माझा उमेदवार असा प्रचार झाला. त्यावेळी म्हटलं, साहेब आणि मी काही वेगळे आहेत का?. आम्ही तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आताही वेगळे नव्हतो, काळजी करू नका, असे अजित पवारांनी म्हटले. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अजित पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील फुटीवर चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील बंड नेमकं काय? हे कोडं अनुत्तरीतच राहिल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी सकाळी केलेलं ते विधान आणि त्यानंतर एकाच व्यासपीठावरील उपस्थितीची चर्चा आज महाराष्ट्रात होत आहे.