पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे दोन्ही साहित्य व चित्रपटविषयक उत्सव फेब्रुवारीमध्ये एकाच कालावधीत होणार आहेत. ‘पिफ’ किंवा साहित्य संमेलन यांपैकी एकाचीच निवड रसिकांना करावी लागणार आहे. यामुळे रसिक आता कुणाला पसंती देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वर्धा येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन, तर याच कालावधीत दि. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवदेखील रंगणार आहे. विविध पुस्तकांचे वाचन करण्याबरोबरच जागतिक दर्जेदार कलाकृतींचा आनंद घेणारा एक मोठा रसिक वर्ग आहे. विशेषत: तरुण पिढी कोरोनानंतर या दोन्ही गोष्टींकडे वळल्याचे चित्र आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये साहित्य संंमेलन आणि पिफ दोन्हींचा आस्वाद घेण्यासाठीच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, पिफच्या तारखा पुढे ढकलल्या असून, नेमके संमेलनाच्याच तारखांनाच पिफ आल्याने या दोन्ही उत्सवांत सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांचा भ्रमनिरास होणार आहे.
पूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पिफ झाल्यानंतर साहित्य संमेलनाला जाण्याचे अनेकांकडून नियोजन सुरू होते. त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता पिफ की साहित्य संमेलन, या पेचात अनेकजण सापडले आहेत. पिफ आधी झाला असता तर आम्हाला साहित्य संमेलनालाही जाता आले असते. यंदा माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर संमेलनाध्यक्ष असल्याने त्यांचे विचार ऐकण्याची आम्हांला इच्छा आहे; पण त्याचबरोबर पिफमधले दर्जेदार चित्रपटही आम्हाला सोडायचे नाहीत; काय करावे कळत नाही, असे काही तरुणांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखविले.
पिफची नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू
पिफ महोत्सवासाठी यंदा ७२ देशांमधून १ हजार ५७४ चित्रपट आले असून, त्यापैकी १४० चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डाॅ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवासाठी निवड झालेल्या व जागतिक स्पर्धा विभागात १४ चित्रपटांची घोषणादेखील यावेळी करण्यात आली. यंदाच्या वर्षी महोत्सव हा केवळ चित्रपटगृहात होणार असून, महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून (दि. ५) www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर, तर चित्रपटगृहांबाहेरील नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
जागतिक स्पर्धा विभागात निवड झालेले १४ चित्रपट
क्लॉन्डाइक (युक्रेन, टर्की), परफेक्ट नंबर (पोलंड), थ्री थाउजण्ड नंबर्ड पिसेस (हंगेरी), द ब्लू काफ्तान (मोरोक्को, फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क), मेडीटेरियन फिव्हर (पॅलेस्टिन, जर्मनी, फ्रान्स, कतार), एविकष्ण (हंगेरी), मिन्स्क (एस्टोनिया), वर्ड (पोलंड), बटरफ्लाय व्हिजन (युक्रेन, क्रोशिया, स्वीडन, चेक रिपब्लिक), तोरी ॲण्ड लोकिता (बेल्जियम, फ्रान्स), अवर ब्रदर्स (फ्रान्स), व्हाइट डॉग (कॅनडा), बॉय फ्रॉम हेवन (स्वीडन, फिनलँड, फ्रान्स, डेन्मार्क), दिनेलेंतू भारत).
''साहित्य संमेलन आणि पिफ एकाच कालावधीमध्ये येत आहे याची कल्पना नव्हती; पण आता इतके साहित्य-चित्रपटविषयक उपक्रम होत आहेत. त्यामुळे साहित्य व चित्रपट रसिकांना वेगळेच ठेवावे लागणार आहे. - डॉ. जब्बार पटेल, संचालक, पिफ''