पुणे : कोरोनाबाधित रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी सह्याद्री हॉस्पिटलला उशिरा का होईना जाग आली आहे. येत्या दोन दिवसांत वसूल केलेली वाढीव बिले संबंधित कोरोनाबाधितांना परत करण्याचा शब्द त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची आकारणी केलेली वाढीव बिले परत देण्याबाबत महापालिकेकडून सह्याद्री हॉस्पिटलला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांच्या व्यवस्थापनासोबत महापालिकेने बैठक घेऊन जानेवारी महिन्यात सदर बिल कमी करण्याची सूचना केली होती. मात्र या सर्व सूचना, बैठकांना न जुमानता सह्याद्री हॉस्पिटलने अवाजवी बिल आकारणी चालूच ठेवली होती. या संदर्भातले वृत्त बुधवारी (दि.२) ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर रुग्णालयाने तातडीने महापालिकेशी संपर्क साधून महापालिकेने सूचना केल्याप्रमाणे बिलांची आकारणी करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार घेतलेली वाढीव रक्कम परत केली जाणार आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल जिल्हाधिकारी कार्यालयानेही घेतली असून त्यांनी महापालिकेकडे विचारणा केली.
सह्याद्री हॉस्पिटलने रुग्णांची वाढीव बिले तातडीने पर केली नाही तर या हॉस्पिटलचा नर्सिंग होम परवाना सहा महिन्यांकरता निलंबित करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी तातडीने पालिका गाठली. त्यानुसार काही तासांची मुदत हॉस्पिटलला दिली आहे. यावेळी वाढीव बिले परत न केल्यास हॉस्पिटलचा परवाना सहा महिन्यांकरिता निलंबित करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.