पुणे: जंगली महाराज रोडवरील साई पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत नदीकाठी जमलेल्या ८ जणांच्या टोळक्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. शिवाजीनगर आणि डेक्कन पोलिसांनी एकत्रित केलेल्या या कामगिरीचा पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गौरव केला आहे.
गौतम ऊर्फ लखन अंबादास बनसोडे (वय २९, रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर), अश्रु खंडु गवळी (वय १९, रा. दांडेकर पुल), राम विलास लोखंडे (वय २३), रोहन किरण गायकवाड (वय १९), रोहित चांदा कांबळे (वय १९), किरण सिताप्पा कांबळे (वय १९, सर्व रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), ओंकार बाळु ननावरे (वय २१), श्याम विलास लोखंडे (वय २०, दोघे रा. राजेंद्रनगर नवी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयता, स्टिलचा रॉड, २ चाकू, ९ मास्क, मिरचीची पुड आणि नायलाॅनची रस्सी असा माल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री गस्त घालत असताना वृद्धेश्वर घाट येथील नदीपात्रालगत असलेल्या गोठ्याजवळ ८ ते ९ मुले हातात शस्त्रे घेऊन जमली असल्याची माहिती मिळाली. शिवाजीनगरचे पथक तातडीने तेथे पोहचले. त्यांना अंधारात मुले आढळून आली. रात्रीचा अंधार, माेकळे मैदान यामुळे ते पळून जाण्याची शक्यता होती. तेव्हा भोलेनाथ अहिवळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्याचे रात्रपाळीवरील उपनिरीक्षक मिरा कवटीकवार व त्यांच्या सहकार्यांची मदत मागितली. दोन्ही बाजूने दोन पथकांनी मुलांना घेरले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले. तेव्हा काही अंतर पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना पकडले. जंगली महाराज रोडवरील साई पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत ते होते, अशी कबुली त्यांनी दिली.
डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस, शिवाजीनगर चे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड, शंकर साळुंखे, सहायक निरीक्षक भोलनाथ अहिवळे, उपनिरीक्षक मिरा कवटीकवार, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर वाघोले, रामकृष्ण काकड, श्रीकृष्ण सांगवे, विकास सराफ आणि डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अशोक इनामदार, गणेश तरंगे, शेखर कौटकर, निलेश सोनवणे, नागनाथ बागुले,जगदीश तळोले, मिलिंद कदम यांनी ही कामगिरी केली.