पुणे : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे बुधवारी लाखो वैष्णवांसह पुण्यात आगमन झाले आहे. आळंदीतील अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला होता. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्र्भिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान करून काल माउलींच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. आज सायंकाळी ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात पुण्यात आगमन झाले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुपारी दीड वाजता कळस (नगर रस्ता) मध्ये पोहचली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांची पालखीही दुपारी पावणे दोन वाजता बोपोडीतील हॅरिस पूलाजवळ पोहचली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, सहआयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.
बुधवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माउलींच्या पालखीला नैवद्य दाखविण्यात आला. पावणेसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व अजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात आले. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्याच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली. वाजत - गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावला. थोरल्या पादुका मंदिरात अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाल्या होत्या.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसाव्यासाठी जाणार आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे.