चारुदत्त आफळे : पुणे कीर्तन महोत्सवात उलगडली संत नामदेव विजय यात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संतश्रेष्ठ नामदेव महाराज हे मराठी भाषेतील पहिले कीर्तनकार व आत्मचरित्रकार होते. समकालीन संतांची चरित्रे त्यांनी गाथेद्वारे मांडली. महाराष्ट्राबाहेर गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, बंगाल, हरियाणा आणि पंजाबमध्ये त्यांनी कीर्तने व हिंदी अभंगरचनांचा प्रचार केला. त्यामुळे भागवत पंथाचे हे पहिले महान प्रचारक होते, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथून आॅनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्ध सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा चारुदत्त आफळे हे संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून उलगडत आहेत.
आफळे म्हणाले, ''''''''गुरुनानक यांचा जन्म नामदेव महाराजांच्या नंतर झाला. त्यांनी शिख पंथ स्थापन केला आणि त्यांच्या उपासनाग्रंथात नामदेवांचे अभंग समाविष्ट केले. शैव, वैष्णव असा वाद मिटवून सर्व पंथातील श्रेष्ठ संतांना पंढरीच्या वारीत सामावून घेण्याचे काम नामदेवांनी केले. जातींच्या भिंती तोडून चोखा मेळ्यांची समाधी पंढरीमध्ये बांधणारे देखील संत नामदेवच होते. त्यामुळेच त्यांना पांडुरंग मंदिराच्या पायरीस महासमाधी घेण्याचे भाग्य मिळाले.''''''''
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या फेसबुक पेजवरुन हा महोत्सव रसिकांना विनामूल्य पहायला मिळत आहे. पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने आॅनलाईन पद्धतीने कीर्तनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.