वरवंड : टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सायंकाळी वरंवड येथे मुक्कामी पोहोचला. सायंकाळी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यवतचा मुक्काम आटोपून सकाळपासूनच वारकरी हळूहळू वरवंड गावात दाखल झाले. विठूरायाच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वरवंड नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले पालखी सोहळ्याचा स्वागतसाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पालखी सोहळा गावापर्यंत आणण्यात आला आहे. टाळ-मृदंगाचा गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालखी येणार असल्यामुळे स्वागतासाठी स्वागतकमानी रांगोळीचा पायघड्या तसेच पालखी सोहळ्याचा स्वागतासाठी ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळी काढल्या होत्या. पालखी नवीन विठ्ठल मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर विठ्ठल नामाच्या जयघोषात रिंगण पूर्ण केले.
विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, भगवे झेंडे घेतलेल्या वारकऱ्यांनी मंदिराला रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेऊन मंदिरामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर आरती व नेवैद्य दाखविल्यानंतर विणेकरी यांनी दर्शन घेतल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. दर्शन रांगेत महिला व पुरुष स्वतंत्र रांगा केल्या होत्या.
नवीन विठ्ठल मंदिर परिसरात विधुत रोषणाई करण्यात आली होती. या सोहळ्यात स्वच्छतेचे संदेश,निर्मल वारी संदेश, झाडे लावा, झाडे वाचवा असे फलक लावण्यात आले होते तसेच आरोग्य विभागाच्या वतीने मंदिर परिसरात आरोग्य तपासणी केंद्र ठेवण्यात आले होते तसेच प्रशासनाचा वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी आमटी, भात, लापशी ठेवण्यात आले होते.