इंदापूर : ज्ञानोबा तुकाराम...ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करत ४० वारकऱ्यांची दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाल्यानंतर फक्त इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात काही तासांसाठी विसावला. पालखी रथांचे इंदापूरमध्ये आगमन होताच मेघराजाने पावसाच्या जोरदार सरींनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत वातावरण भक्तिमय झाले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा क्षेत्र पंढरपूरकडे सालाबादप्रमाणे यंदाही निघाला. परंतु कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी, काही मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित क्षेत्र देहू येथून, फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमध्ये पालखीतील संत तुकाराम महाराज यांच्या मानाच्या पादुका छोट्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा प्रथेप्रमाणे इंदापुरात दाखल झाला. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी पालखीतील पादुकांना पुष्पहार घालत, मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, तसेच इंदापूर अर्बन बँकेचेचे माजी चेअरमन भरत शहा, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे, बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्यासह शहरातील मानाचे वारकरी उपस्थित होते.
इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पालखी रथासाठी शामियाना उभारण्यात आला होता. अत्यंत सुबक रांगोळ्या काढत फुलांची आरास करण्यात आली होती. हरिनामाचा जयघोष मंडपात सुरू होता. सोमवार ( दि. १९ ) रोजी दुपारी २. ४५ वाजता संत तुकोबारायांचा पालखी सोहळा दाखल झाला. पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, माजी पालखी सोहळा अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित मोरे, प्रल्हाद महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे विधिवत पौराहित्य करणारे टांकसाळे गुरुजी, शिंगाड वादक पोपट तांबे, मानाचे वारकरी टाळकरी यांचे स्वागत इंदापूरकरांच्या वतीने करण्यात आले.
पालखी सोहळा समवेत आलेल्या वारकऱ्यांना फराळ अन्नदान यावेळी करण्यात आले. त्यानंतर ३.३० वाजता पालखी सोहळा हरिनामाचा गजर करत क्षेत्र पंढरीकडे मुक्कामासाठी रवाना झाला.