देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सजली असून, हरिनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. वैष्णवांना पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्याची आस लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या दाखल झाल्या असून, देहूतील इंद्रायणीतीर वैष्णवांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. गावात प्रवेशिणाऱ्या दिंड्यांना मुख्य मंदिराच्या महाद्वारातून प्रवेश दिला जात होता, तर भाविकांना मंदिराच्या दर्शनबारीने दर्शनासाठी जावे लागत होते. दर्शन झालेले भाविक इंद्रायणी नदीच्या तीरावरील नव्याने बांधण्यात आलेल्या घाटावर क्षणभर विसावत होते. तेथेच अंघोळ, पूजापाठ करून भगवंताचे नामस्मरण करताना दिसत होते. टाळ-वीणा व मुखी हरिनामाचा जप सुरू होता. त्यामुळे इंद्रायणी नदीकाठ हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता, तर सोहळाप्रमुखांनी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. मुख्य मंदिरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अकलूजच्या मोहिते पाटलांचा अश्व सोमवारी सकाळी देहूत दाखल होणार आहे. निर्मल वारी संकल्पनेतून गावात तात्पुरत्या स्वरूपातील ३०० शौचालयांची उभारणी पूर्ण झाली आहे. पोलीस बंदोबस्तांसाठी यासाठी ४५० पुरुष व महिला पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड कार्यरत आहेत. इंद्रायणीच्या पात्रातून बोटीवरून नदीच्या घाटावर एनडीआरएफचे जवान लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळपासूनच जड वाहनांची वाहतूक थांबविली जाणार असून, कॅनबे चौकातून चाकणमार्गे तळेगावकडे वळविण्यात येईल. (वार्ताहर)सोमवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या दरम्यान पावसाने हजेरी लावली. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पावसामुळे वैष्णव आनंदून गेल्याचे दिसून आले. राज्यात पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, असे साकडे सोहळाप्रमुख तुकोबाराय आणि पांडुरंगास घालणार आहेत. तसेच, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले जाणार आहे.
वारीसाठी सजली देहूनगरी
By admin | Published: June 27, 2016 12:46 AM