भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने मुसळधार पावसासाठी सरपंच महादेव बोरावके यांनी भुलेश्वरास महापूजा करून साकडे घातले.
पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी, भुईमूग, मूग, मुगी, वाटाणा आदी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या करण्यात आल्या. यंदा समाधानकारक पिके येण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पावसाने पाठ फिरवली असून, यासाठी मंदिर धुण्याचा निर्णय घेण्यात आला.
भुलेश्वर मंदिराच्या मुख्य शिखराचा आतील भाग, सभामंडप, महाकाय नंदीमंडप, प्रदक्षिणा मार्ग, खांब, दगडी शिल्प, मंदिरासमोरील भाग, पाण्याने स्वच्छ धुण्यात आला. माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, माजी सरपंच बाळासो यादव यांच्या हस्ते भुलेश्वरास दही, दूध, व पंचामृताने आंघोळ घालण्यात आली. माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी मुसळधार पावसासाठी भुलेश्वरास साकडे घातले. मंदिर धुऊन झाल्यानंतर लगेचच पावसाने हजेरी लावली. या वेळी हर हर महादेवच्या गजरात मंदिर दुमदुमून गेले. या वेळी उद्धव महाराज यादव, माजी सरपंच बाळासो यादव, सुनील यादव, महादेव यादव, शंकर लोळे व श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील पुजारी उपस्थित होते.
फोटो ओळ : श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर पाण्याने धुऊन पावसासाठी साकडे घालण्यात आले.