आळंदी : कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून मराठी तसेच इंग्लिश माध्यमांच्या शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, या काळात विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या खासगी तसेच अन्य शिक्षण संस्था विविध समस्यांना सामोऱ्या जात आहेत.
विशेषतः खासगी शिक्षण संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल संस्थापक महासंघाच्या अध्यक्षा सुदर्शना त्रिगोनाइत, सचिव प्रा. विजय गुळवे आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शिक्षण संस्थांच्या विविध समस्यांवर चर्चा केली.
शासनाकडे मागील तीन ते चार वर्षांपासून शाळांचे २५% आर. टी. ई. प्रवेश मोबादला बाकी असून तो वितरित करावा. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास करून देण्यासाठी किमान ७५% फी भरण्याची अट उपलब्ध करून द्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळेच्या बसेसचे थकलेले हप्त्याचे व्याज व हप्ते वसुलीचा तगादा थांबविण्याचा संबंधितांना सूचना द्याव्यात. इंग्रजी तसेच खासगी माध्यमासबंधी कोणताही शासन निर्णय घेताना संबंधित संस्थाचालक किंवा शाळांना विश्वासात घ्यावे. शिक्षण संस्थांना होणारी अरेरावी थांबविण्यासाठी उपाययोजना करावी, अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन मुख्याधिकारी प्रसाद यांना देण्यात आले. दरम्यान, या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत वरिष्ठ पातळीवर शिक्षण संस्थांच्या मागण्या कळवून त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
०२ आळंदी
पुणे येथे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांना लेखी निवेदन देताना शिक्षण संस्थांचे पदाधिकारी.