पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे पाईक असून शाहू महाराजांच्या नावाने सुरू असलेली सारथी संस्था जिवंत ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे,अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन करणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेंची(सारथी) तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी सहा दिवसांपासून सारथीबाहेर तारादूतांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास संभाजी राजे यांनी भेट दिली.त्यानंतर तारादूत प्रकल्प मोडीत काढणे दुर्दैवी असल्याची खंत संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दोन महिन्यांपूर्वी सारथीची स्वायत्तता कायम ठेवण्याबाबतचा शासननिर्णय काढण्यात आला. मात्र, तरीही अद्याप तारादूत प्रकल्प सुरू करण्यता आला नाही. परंतु, तारादूतांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास पुन्हा रस्त्यावर उभे राहू, असा इशाराही संभाजी राजे यांनी दिला.