जेजुरी, दि.४ श्रीक्षेत्र जेजुरी येथील नगरपालिकेने भरमसाठ केलेली घरपट्टी वाढ रद्द करून जुन्या दराने वसुली करावी व मालमत्तांचे फेर सर्वेक्षण व्हावे या मागणीसाठी जेजुरी घरपट्टी वाढविरोधी कृती समितीने गुरुवारी मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये कृती समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गावडे ,पालिकेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, शिवसेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे, भाजपचे प्रसाद अत्रे यांचा समावेश होता. नगर विकास मंत्री शिंदे यांनी समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले, येत्या आठ दिवसांत जेजुरीच्या मुख्याधिकारी यांच्याबरोबर मंत्रालयात या विषया संदर्भात बैठक घेण्याची त्यांनी सूचना केली. या बैठकीत फेरसर्वेक्षण व योग्य घरपट्टीवाढ या मागणीबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे .
जेजुरी नगरपालिकेने सन २०१८ मध्ये बेसुमार घरपट्टी वाढ केल्याने त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. जेजुरी बंद, निषेध मोर्चा, धरणे अशी आंदोलने झाली. परंतु नगरपालिकेने वाढविलेली अवाजवी घरपट्टी वाढ रद्द न केल्याने नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर नगरपालिकेने घरमालकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून घरासमोर बँड वाजवणे. मोठ्या फलकावर थकबाकीदारांची नावे छापणे, अशी कारवाई करण्याचे जाहीर केल्याने घरमालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ महिने खंडोबा मंदिर बंद होते. त्यामुळे येथील अर्थव्यवस्था कोलमडली असून नागरिक आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. जेजुरीत साडेचार हजाराच्या आसपास मालमत्ता आहेत. नगरपालिका व कृती समिती यांनी योग्य मार्ग काढावा. २०१७-२०१८ यावर्षी असलेल्या जुन्या दराने घरपट्टी घ्यावी, अशी स्थानिक मालमत्ताधारकाची मागणी आहे.