लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर अंतरात, जमिनीच्या खाली ३० मीटरवर शहराची नवी ओळख आकार घेत आहे. सिव्हिल कोर्टापासून पुढे सुरू झालेल्या मेट्रोच्या भुयाराचे काम आता मुठा नदीजवळ पोहोचले आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत भुयार नदीपार होऊन पुढचे कसबा पेठेत जाण्याचे काम सुरू होईल.
सिव्हिल कोर्टाजवळ मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. त्याचे काम सुरू आहे. कृषी महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट काम पूर्ण झाले आहे. आता पुढचे काम सुरू आहे. जमिनीखाली ३० मीटर खोलीवर दोन टनेल बोअरिंग मशिनने हे काम सुरू आहे. मुठा नदीच्या तळाखाली १३ ते १४ मीटर अंतरानंतर ही दोन्ही भुयारे जातील. वर नदीचे पाणी आणि खालून मेट्रो धावते आहे, अशी स्थिती असेल.
पुढे कसबा पेठेत दादोजी कोंडदेव महापालिका शाळेच्या जुन्या जागेत भुयारी स्थानक आहे, तिथपर्यंत हा बोगदा जाईल. तिथून पुढे मंडईत झुणका-भाकर केंद्रापर्यंत खोदकाम होणार आहे. स्वारगेटपासून सुरू झालेले दोन्ही बोगद्यांचे कामही मंडईपर्यंत होणार आहे. तिथून सर्व यंत्र जमिनीवर घेतली जातील. या ५ किलोमीटरच्या अंतरात ५ भुयारी स्थानके आहेत. प्रत्येक स्थानकात दोन्ही भुयारे एकत्र होतील. मध्ये फलाट व दोन्ही बाजूला जाणारी व येणारी अशा दोन मेट्रो असतील.