धायरी : “छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा पुण्यातील शिल्पकाराने साकारल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांनी या शिल्पाचे कौतुक केले आहे. हे भव्य दिव्य आणि तेजस्वी शिल्प सर्व मावळ्यांच्या मनावर राज्य करेल,” असे प्रतिपादन राज्याचे औद्योगिक विकासमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
नऱ्हे येथील चित्रकल्पक स्टुडिओमध्ये साकारण्यात येणाऱ्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्याकरता देसाई शुक्रवारी (दि. ९) आले होते. तेव्हा ते बोलत होते. आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अंबादास दानवे, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक पांडे, औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर अभियंता एस. डी. पानझडे, शिल्पकार दीपक थोपटे, पुण्याच्या नगरसेविका अश्विनी पोकळे, शिवसेना उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे, किशोर पोकळे आदी या वेळी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, औरंगाबादेतील क्रांती चौकात एकवीस फूट इतके देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प आरूढ होणार आहे. संपूर्ण औरंगाबाद आणि राज्यातील जनतेसाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. शिल्पकार दीपक थोपटे यांचे कौशल्य पाहून औरंगाबाद महानगरपालिकेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. त्यांनी अतिशय तेजस्वी मूर्ती त्यांनी साकारली आहे.” सूत्रसंचालन शिवसेना विभागप्रमुख नीलेश गिरमे यांनी केले.
चौकट
असे आहे शिल्प
२१ फूट उंच अन् २२ फूट लांब
“छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प हे २१ फूट उंच व २२ फूट लांब आहे. या अश्वारूढ पुतळ्याचे वजन ६ टन असून ते ब्राँझ धातूपासून बनविण्यात येत आहे. येत्या डिसेंबर ते जानेवारीपर्यंत हे शिल्प पूर्ण करण्याचा मानस आहे,” असे शिल्पकार दीपक थोपटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
छायाचित्र ओळ : औद्योगिक विकासमंत्री सुभाष देसाई यांनी काम सुुरू असलेल्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली.